Health Tips: माठातील पाणी अमृतापेक्षा कमी नाही; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
उन्हाळ्यात तहान लागली की थंड पाणी पिण्याची इच्छा होते. अनेक जण फ्रिजमधील थंड पाणी पितात, पण ते आरोग्यासाठी घातक असते. तज्ञ सांगतात की, फ्रिजमधील पाणी पिल्याने घशाचे त्रास वाढतात आणि पोटाच्या समस्या होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात माठातील पाणी पिणे चांगले ठरते. हे पाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. तसेच माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड राहते. आयुर्वेदात याला अमृतासमान मानले जाते.
माठातील पाणी थंड कसे राहते?
माठातील पाणी बाष्पीभवन (Evaporation) प्रक्रियेमुळे नैसर्गिकरित्या थंड राहते. मातीच्या भांड्याला असणाऱ्या हजारो सूक्ष्म छिद्रांतून पाणी पाझरते आणि बाहेरच्या उष्णतेमुळे त्याचे बाष्पीभवन होते, ज्यामुळे माठातील पाणी गार राहते. त्यामुळे माठ नेहमी खिडकीजवळ किंवा हवा खेळती असलेल्या ठिकाणी ठेवावा, जेणेकरून बाष्पीभवन जलद होऊन पाणी जास्त थंड होते.
माठातील पाणी पिण्याचे फायदे
-आजकाल डॉक्टरसुद्धा फ्रिजमधील पाण्यापेक्षा माठातील पाणी पिण्याची शिफारस करतात. कारण हे पाणी नैसगिर्करित्या थंड झालेले असते.
-आरोग्य तज्ञांच्या मते, हे पाणी घशासाठी आणि आतड्यांसाठी फायदेशीर असते. एखादा आजारी माणूसही हे पाणी पिऊ शकतो.
-माठातील पाणी पचनास हलके असते. यामुळे चयापचय क्रिया चांगली राहते आणि ॲसिडिटीची समस्या कमी होते. ज्यांना पोटाच्या समस्यांचा त्रास होतो, त्यांच्यासाठी माठातून पाणी पिणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
-मातीतील नैसर्गिक खनिजे जसे की, कॅल्शियम, मॅग्नेशियम) पाण्यात मिसळतात, ज्यामुळे पाण्याचे पोषणमूल्य वाढते.
-माठ पाणी शुद्ध करण्यासाठी नैसर्गिक फिल्टर म्हणून काम करतो आणि पाण्याची पीएच पातळी संतुलित ठेवतो. यामुळे शरीरात साचलेले विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. माठातील पाणी हे एक नैसर्गिक डिटॉक्स वॉटर म्हणून काम करते.
-फ्रिजमधील पाणी खूप थंड असल्यामुळे घशातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे वारंवार घशाचे त्रास होतात. याउलट माठातील पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. ते प्यायल्याने घशाचे संरक्षण होते, सर्दी आणि तापापासून आराम मिळतो.
हे लक्षात ठेवा:
-दर ४ ते ५ दिवसांनी माठ स्वच्छ करा.
-माठातील खूप शिळे पाणी पिणे टाळा.
-पाणी भरल्यावर माठ नेहमी झाकून ठेवा.
-तसेच थेट सूर्यप्रकाशात माठ ठेवू नका.
Comments are closed.