एमएस धोनी आयपीएल 2026 मध्ये किती सामन्यांना मुकणार? मोठी अपडेट समोर…

एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिग्गज विकेटकीपर-महेंद्रसिंग धोनी सध्या आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असून, आयपीएल 2026 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो खेळताना दिसणार नाही. दुखापतीमुळे तो किमान दोन ते तीन आठवडे मैदानाबाहेर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) फ्रँचायझीने सुरुवातीला धोनी दोन आठवडे अनुपस्थित राहील असे सांगितले होते. मात्र, ताज्या रिपोर्टनुसार त्याची पुनरागमनाची शक्यता एप्रिलच्या अखेरीसच आहे. त्यामुळे 23 एप्रिलपूर्वी त्याचे मैदानात उतरणे कठीण मानले जात आहे. अशा परिस्थितीत तो किमान सहा सामने मिस करु शकतो, जे सीएसकेसाठी मोठा धक्का आहे.

सीएसके आपला पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध गुवाहाटी येथे खेळणार आहे. मात्र, धोनी या सामन्यासाठी संघासोबत गेलेला नाही. तो सध्या चेन्नईमध्येच राहून पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. संघ व्यवस्थापन त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून असून, तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच मैदानात परतणार आहे.

धोनीच्या अनुपस्थितीत विकेटकीपिंगची जबाबदारी संजू सॅमसनकडे सोपवण्यात आली आहे. सीएसकेने त्याला ट्रेडद्वारे संघात सामील केले आहे. दरम्यान, ऋतुराज गायकवाड संघाचे नेतृत्व करत असला तरी संघाची रणनीती अजूनही धोनीभोवतीच फिरताना दिसते.

धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, मात्र आयपीएलमध्ये तो अजूनही सक्रिय आहे. मागील हंगामात त्याने खालच्या फळीत फलंदाजी करत ‘फिनिशर’ची भूमिका बजावली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो गुडघ्याच्या समस्येमुळे त्रस्त आहे आणि 2023 मध्ये त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती.

Comments are closed.