13 वर्षांची लाजिरवाणी मालिका! आज तरी पुसला जाणार का मुंबई इंडियन्सचा ‘पहिल्या सामन्याचा’ खराब रेकाॅर्ड?

आयपीएल 2026 मधील दुसऱ्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रोमांचक लढत रंगणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे पार पडणार असून चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलेली मुंबई इंडियन्स ही स्पर्धेतील सर्वात यशस्वी फ्रँचायझी मानली जाते. मात्र, गेल्या 13 वर्षांपासून हंगामातील पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यात संघ अपयशी ठरत आहे. मुंबईने शेवटचा ओपनिंग सामना 2012 साली जिंकला होता. त्यानंतर प्रत्येक वेळी पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे यंदा कर्णधार हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखाली हा ‘दाग’ पुसण्याचा संघाचा निर्धार असेल.

यंदाच्या हंगामात मुंबईचा संघ कागदावर अत्यंत मजबूत दिसत आहे. फलंदाजीत रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक आणि रयान रिकेल्टन यांच्यासारखे धडाकेबाज सलामीवीर आहेत. मधल्या फळीमध्ये सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या आणि नमन धीर यांच्यासारखे विश्वासार्ह फलंदाज आहेत. याशिवाय शेरफेन रदरफोर्ड, विल जॅक्स आणि शार्दुल ठाकूर हे ऑलराउंडर संघाला अतिरिक्त बळ देतात.

गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह हा संघाचा मुख्य अस्त्र असून त्याला दीपक चाहर आणि ट्रेंट बोल्ट यांची साथ मिळणार आहे. फिरकीत मिचेल सॅन्टनर, अल्लाह गजनफर आणि मयंक मार्कंडे हे पर्याय उपलब्ध आहेत.

इतिहास पाहता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांचा वरचष्मा राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 35 सामने झाले असून मुंबईने 24 वेळा विजय मिळवला आहे, तर केकेआरने 11 सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे वानखेडेवर झालेल्या 12 पैकी 10 सामन्यांमध्ये मुंबईने बाजी मारली आहे.

आता आजच्या सामन्यात हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स 13 वर्षांचा अपशकून मोडून विजयाने हंगामाची सुरुवात करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.