लहानपणी आईचे छत्र हरपले, काकाने केला सांभाळ! पोलार्डचा विक्रम मोडणाऱ्या अनिकेत वर्माचा आयपीएल प्रवास

शनिवारी (२८ मार्च) आयपीएल २०२६ ची सुरूवात विराट कोहलीने जबरदस्त केली. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज सनरायझर्स हैद्राबादचा पराभव केला. या सामन्यानंतर विराटची चर्चा अधिक सुरू आहे. तसेच हैद्राबादकडून प्रभारी कर्णधार ईशान किशनने ३८ चेंडूत ८० धावा करत सर्वांचे लक्ष वेधले. यामध्ये एका खेळाडूनेही अप्रतिम कामगिरी केली. त्याचा हा आयपीएल प्रवास म्हणावा तितका सोपा नाही.

हैद्राबादकडून अनिकेत वर्मा याने १८ चेंडूत ४३ धावा केल्या. त्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत तीन चौकार आणि चार षटकार मारत ही कामगिरी केली. त्याची आयपीएलमध्ये एंट्री कशी झाली हे जाणून घेऊ.

अनिकेतचे लहानपण संघर्षांनी भरलेले होते. त्याचा जन्म उत्तर प्रदेशमधील झासीमध्ये झाला. नंतर त्याचे कुटुंब मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये स्थायिक झाले. अवघ्या तीन वर्षाचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. आर्थिक स्थिती हलाखीची असतानाही अनिकेतने क्रिकेटप्रेम कायम राखत खूप मेहनत केली.

अनिकेत माध्यामांशी बोलताना म्हणाला, “जेव्हा आम्ही भोपाळला आलो, तेव्हा आमची आर्थिक स्थिती वाईट होती. आमचे स्वत: चे घर नव्हते, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. मला आठवतंय की १५ वर्षाखालील संघात खेळायला जायचे होते, तेव्हा माझ्याकडे फोन नव्हता. काकांनी दोन-तीन जणांकडून पैसे उसने घेत माझ्यासाठी तो विकत घेतला.”

अनिकेतला हैद्राबादने २०२५ साठी विकत घेतले होते, तेव्हा त्याने भारतीय संघाकडून एकही सामना खेळला नव्हता. त्याला ३० लाख रुपयांच्या मूळ किंमतीवर खरेदी केले होते.

अनिकेत मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज आहे. डिसेंबर २०२४ मध्ये त्याने अंडर-२३ वनडे स्पर्धेत कर्नाटकविरुद्ध मध्य प्रदेशकडून खेळताना ७५ चेंडूत ६ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद १०१ धावा केल्या होत्या. याच खेळीमुळे त्याच्याकडे लक्ष गेले. आयपीएलमध्ये खेळण्याआधी त्याला केवळ एका टी२० सामन्याचा अनुभव होता, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशकडून खेळताना तो हैद्राबादविरुद्ध शून्यावर बाद झाला होता.

अनिकेतने आयपीएलमध्ये हैद्राबादसाठी दुसऱ्या सामन्यात १३ चेंडूत ५ षटकार मारत ३६ धावा केल्या होत्या. त्यानंतरच्या सामन्यात ४१ चेंडूत ६ षटकारांच्या साहाय्याने ७४ धावा केल्या होत्या. २०२५ च्या हंगामात त्याने १४ सामने खेळले आणि २३६ धावा केल्या. आता त्याने आयपीएल २०२६ च्या हंगामाचीही धमाकेदार सुरूवात केली असून पुढील सामन्यात तो कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असेल.

याबरोबरच अनिकेत आयपीएलमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केला. हे करताना त्याने दिग्गज कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या यांना मागे टाकले आहे. या दोघांनी प्रत्येकी ३-३ षटकार मारले आहेत.

Comments are closed.