खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींचे वर्चस्व! तन्वी धुर्वे, साक्षी बुरकुलेची सुवर्ण भरारी
पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल स्पर्धेत महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकांची लयलूट केली आहे. यवतमाळच्या साक्षी बुरकुलेने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून दिवस गाजविला. नागपूरच्या तन्वी धुर्वेने महाराराष्ट्राच्या सुवर्ण पदकाचे खाते उघडले. तन्वी पाठोपाठ पलाश ठाकुरने पदकांचा डबल धमाका करीत दिवस गाजविला.
ट्राइबल स्पर्धेच्या पहिल्याच पर्वात महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमला. तन्वी धुर्वेने 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण यशाला गवसणी घातली. पलाश ठाकूरने 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक व 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात रौप्य पदकाची कामगिरी केली. 200 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात भक्तीश कुमारे कांस्य पदकाचे यश संपादन केले. खेलो इंडियातील कामगिरीबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, क्रीडा आयुक्त शीतल तेली उगले व संघाच्या पथकप्रमुख भाग्यश्री बिले यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. सर्वोत्तम कामगिरीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
वेटलिफ्टिंगच्या 86 किलो गटात सर्वाधिक एकूण 150 किलो वजन पेलून साक्षी बुरकुलेने पर्दापणातच सुवर्ण पदकाचा करिश्मा घडविला. स्नॅच प्रकारातील तिसऱ्या प्रयत्नात साक्षीने 68 किलो तर क्लिन ॲन्ड जर्क प्रकारात 82 किलो वजनाची कामगिरी करीत अव्वल स्थान पटकावले. यजमान छत्तीसगडच्या रूषिका कश्यपने 121 किलोसह रौप्य पदक जिंकले. 118 किलो वजनाची कामगिरी करणाऱ्या आसामच्या बितूपूर्णाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
कर्नाटक आणि ओरीसा नंतर सुवर्णपदक जिंकणार महाराष्ट्राची तन्वी धुर्वे ही पहिलीच खेळाडू ठरली. तिने 1:23.65 सेकंदात शर्यत पूर्ण करीत सुवर्णपदकाचा नाव कोरले. मध्य प्रदेशच्या सृष्टि वर्माने रौप्य तर छत्तीसगढ़च्या न्यासा पैकराने कांस्यपदकाची कमाई केली.
तन्वीने नुकतीच दहावीच्या परीक्षा दिली असून तीने खेलो इंडियात प्रथमच पदक जिंकले आहे. यशानंतर तन्वी म्हणाली, की “मी गेल्या आठ वर्षांपासून मी सराव करते. माझे वडील, सुखदेव, एक आंतरराष्ट्रीय ओपन वॉटर जलतरणपटू असून माझा भाऊ, सार्थक, वॉटर पोलोमध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता आहे . मला माझ्या कुटुंबाकडून प्रेरणा मिळाली आहे..”
मुलीपाठोपाठ महाराष्ट्राच्या मुलांनेही पदकाची कामगिरी केली. 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात पलाश ठाकूरने 32.13 सेकंद वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकले. 31.08 सेकंद सर्वोत्तम वेळेत कर्नाटकच्या मणिकांता एलने सुवर्ण पदकाचा पल्ला पार केला.
Comments are closed.