Ratnagiri News – संगमेश्वर-फुणगुस मार्गावर गॅस पाईपलाईनसाठी रात्री उत्खनन
च्या
संगमेश्वर-फुणगुस मार्गावर सध्या गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी सुरू असलेल्या बेसुमार उत्खननने सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि स्थानिक ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता सुरू असलेल्या या कामामुळे परिसरातील अंतर्गत रस्ते रात्रीच्या वेळी अचानक बंद केले जात आहेत. यामुळे ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, संतापलेला लोकभावनांचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर मोठ्या यंत्रसामग्रीद्वारे उत्खननचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, हे काम दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी अधिक वेगाने केले जाते. अंधारात अचानक रस्ते खोदले जात असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदारांना, दूध व्यावसायिक आणि शाळकरी मुलांना आपले वाहन बाहेर काढणेही कठीण झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत जर एखाद्या रुग्णाला रुग्णालयात न्यायचे असल्यास, रुग्णवाहिका येण्यासाही मार्ग उरलेला नाही, इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या गावांच्या हद्दीत हे काम सुरू आहे, त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींना या कामाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी न घेता किंवा त्यांना साधी पूर्वसूचना न देता सार्वजनिक मालमत्तेचे (रस्त्यांचे) नुकसान केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. “आमच्या गावातील रस्त्यांची ही अवस्था होत असताना आम्हाला विचारले देखील जात नाही, हा लोकशाहीचा अपमान आहे,” अशी भावना ग्रामस्थांमध्ये आहे.
“दडपशाही खपवून घेणार नाही! या प्रकरणावर असुर्डे गावचे सरपंच अत्यंत आक्रमक झाले असून त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि विभागाला कडक शब्दांत सुनावले आहे.”हा कोणता विकास आहे जो लोकांच्या उरात धडकी भरवत आहे? रात्रीच्या वेळी चोरांसारखे रस्ते खोदून ग्रामस्थांची कोंडी करण्याचे धाडस कंपनीने करू नये. आमच्या ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही, रस्ते पूर्ववत करण्याची कोणतीही हमी दिलेली नाही. जर २४ तासांच्या आत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन चर्चेद्वारे मार्ग काढला नाही आणि कामाचे योग्य नियोजन केले नाही, तर आम्ही चालू काम बंद पाडू. ग्रामस्थांच्या संयमाचा अंत पाहू नका, अन्यथा होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार असेल!”
प्रदीप शिंदे सरपंच, असुर्डे ग्रामपंचायत
प्रमुख समस्या आणि मागण्या:
१. उत्खननमुळे मुख्य मार्गासह अंतर्गत जोडणी देणारे रस्ते पूर्णपणे उखडले गेले आहेत.
२.रात्रीच्या वेळी काम सुरू असताना रस्ते बंद असल्याचे फलक किंवा सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत.
३. रस्ता बंद केल्यावर ग्रामस्थांना बाहेर पडण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.
४. कामामुळे उडणाऱ्या धुळीमुळे रस्त्यावरून चालणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आह
- सध्या या मार्गावर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. संबंधित विभागाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन कामाचे नियोजन योग्य पद्धतीने करावे, पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करावी आणि कामामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून रस्ते पुन्हा डांबरीकरण करून द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा, संगमेश्वर-फुणगुस मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Comments are closed.