मुंबईतील 2640 म्हाडा घरांची लॉटरी, आजपासून अर्ज नोंदणी 15 मे रोजी सोडत
म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाने मुंबईतील 2640 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीसाठी उद्या, सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज करता येणार असून 15 मे रोजी सकाळी 11 वाजता लॉटरी काढली जाणार आहे.
मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्यामुळे अनेक जण स्वस्तात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहतात. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते उद्या ‘गो लाइव्ह’ समारंभाद्वारे लॉटरीचा शुभारंभ केला जाणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
- 30 मार्चपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी
- 29 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
- 5 मे रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध होणार
- 12 मे रोजी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी
- 15 मे रोजी सकाळी 11 वाजता सोडत
असा करा अर्ज
सोडतीत सहभागी होण्याकरिता प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरमध्ये Mhada Housing Lottery System या नावे मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरदेखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही कागदपत्रे तयार ठेवा
अर्जदारांना नोंदणीसाठी व पात्रतेसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा पुरावा म्हणून 1.04.2024 ते 31.03.2025 आयकर विवरण पत्र अथवा तहसीलदार यांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
निर्माणाधीन 1762 घरांचा समावेश
बांधकाम सुरू असलेली 1762 घरे, पुनर्विकास प्रकल्पातून मिळालेली 371, 33 (7) अंतर्गत म्हाडाला मिळालेली 188 घरे तसेच मुंबई मंडळाच्या मागील सोडतीमधील शिल्लक 319 घरांचा सोडतीत समावेश आहे.
असे आहेत उत्पन्न गट
- अत्यल्प उत्पन्न गटासाठी सहा लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. अल्प उत्पन्न गटासाठी नऊ लाखापर्यंत, मध्यम उत्पन्न गटासाठी 12 लाखांपर्यंत तर उच्च उत्पन्न गटासाठी 12 लाखांहून अधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्यांचा समावेश आहे.
- अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
अत्यल्प उत्पन्न गटासाठी फक्त 145 घरे
मुंबई मंडळाच्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी केवळ 145 घरे उपलब्ध असणार आहेत. याशिवाय अल्प उत्पन्न गटासाठी 858 घरे, मध्यम उत्पन्न गटासाठी 1408 घरे आणि उच्च उत्पन्न गटासाठी 229 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
गिरगाव, दादर, वडाळा, वांद्रे, चेंबूर येथे घरे
या लॉटरीत कन्नमवार नगर, सिद्धार्थ नगर आणि पहाडी गोरेगाव, जुने मागाठाणे, गोराई, सुभाष नगर – चेंबूर, गांधी नगर – वांद्रे, पंत नगर – घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर – दादर, अँटॉप हिल येथील घरे आहेत.
Comments are closed.