रूपाली चाकणकरांना समन्स, खरातचे राजकीय कनेक्शन एसआयटीच्या रडारवर

भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणाऱया भोंदूबाबा अशोक खरात याचे राजकीय साथीदार आता एसआयटीच्या रडारवर आले आहेत. त्याच्या एजंटांची चौकशी करण्याची तयारी सुरू झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलविले आहे. दरम्यान, खरातची पोलीस कोठडी 1 एप्रिलपर्यंत वाढविली आहे.

भोंदूबाबा अशोक खरात याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तो तपासात सहकार्य करीत नसल्याने अधिक माहिती घेण्यासाठी वेळ हवा आहे, त्याचे फोन कॉल डिटेल्स काढण्यात आले आहेत. कोडवर्डने सेव्ह केलेल्या नंबरच्या व्यक्तींची नावे समोर आणायची आहेत. मालमत्ता, आर्थिक व्यवहार, फसवणूक व अत्याचाराला बळी पडल्याची आणखी प्रकरणे शोधायची आहेत. त्यासाठी पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली. न्यायालयाने खरातच्या पोलीस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

  • राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना हजर राहण्याचे पत्र देण्यात आले आहे. त्यांची कुठे व केव्हा चौकशी होईल याची निश्चित माहिती समोर येऊ शकली नाही.

भूरळ घालून अत्याचार

मानसशास्त्रीय पद्धतीने खरात महिलांचा विश्वास संपादन करायचा. ‘पतीला क्षमतेची व सुंदरतेची जाणीव नाही, कदर नाही’, असे सांगून तो महिलांना आपलेसे करून जाळ्यात ओढायचा. पती-पत्नीत वितुष्ट निर्माण करून महिलांना आपल्या वासनेची शिकार करायचा, असे विशेष तपास पथकाच्या चौकशीत समोर आले आहे.

परदेश दौरे, आर्थिक व्यवहार तपासणार भोंदू खरात हा व्याजाचा मोठा धंदा करायचा, हवाला रॅकेटने देश-विदेशात कोटय़वधींची उलाढाल करायचा, यासाठीच तो सतत परदेश दौरे करत होता. परदेशात त्याची मालमत्ता असल्याचा संशय आहे. ही माहिती मिळविण्यासाठी पासपोर्ट कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. संपत्तीची माहिती घेण्यासाठी आयकर तसेच मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाशीही तपासी पथकाने संपर्क साधला आहे. यामुळे खरातच्या संपूर्ण आर्थिक व्यवहाराची तपासणी होणार आहे. कोणाकडून कसे पैसे आले, कोणाशी भागीदारी, आर्थिक व्यवहार आहे, हे उघड होईल.

दीपक केसरकरांसह काही आमदारांचीही चौकशी होणार

खरातच्या मिरगाव येथील महादेव मंदिरात, नाशिक कार्यालयात आणि बंगल्यावर अनेक अधिकारी, नेते, मंत्री, आमदार, नगरसेवक यांचा वावर होता, अनेकांनी त्याच्याकडे पूजाविधीही केले. त्यांच्या प्रभावाने अनेक जण खरातचे बळी ठरले. या सर्वांना चौकशीसाठी बोलविण्याची तयारी एसआयटीने केली आहे. माजी मंत्री दीपक केसरकर यांना चौकशीसाठी बोलविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही आमदारांसह लोकप्रतिनिधींनाही चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

Comments are closed.