पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने 284 उमेदवारांची घोषणा केली आहे

भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी यांच्याविरोधात प्रदीप प्रसाद

वृत्तसंस्था/कोलकाता

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रदीप प्रसाद यांना उमेदवारी देऊन पक्षाने लढत अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न केला आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरून पक्षाच्या पुनरागमनाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. ते बहारामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवतील. याशिवाय, माजी खासदार मौसम नूर यांना मालतीपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेस पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 294 जागांवर निवडणूक लढवत असून त्यांनी एकाचवेळी 284 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाने विशेषत: मुर्शिदाबाद आणि मालदा या आपल्या पारंपरिक बालेकिल्ल्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसने दार्जिलिंगमधून माधवर राय, सुजापूरमधून अब्दुल हन्नान, डमडममधून सुष्मिता बिस्वास, डायमंड हार्बरमधून गौतम भट्टाचार्य, आसनसोल दक्षिणमधून सौविक मुखर्जी आणि आसनसोल उत्तरमधून प्रसेनजीत पुईतांडी यांनाही उमेदवारी दिली आहे.

बंगाल निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार निवडण्याकरिता काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक शनिवारी झाली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि पश्चिम बंगालचे नेते उपस्थित होते. काँग्रेसची ही उमेदवार निवड विशेषत: मालदा आणि मुर्शिदाबादसारख्या पारंपरिकदृष्ट्या मजबूत असलेल्या भागांमध्ये आपली पकड अधिक मजबूत करण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून पाहिली जात आहे. या भागांमध्ये प्रभावशाली उमेदवार उभे करून निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याची काँग्रेस तयारी करत आहे.

Comments are closed.