पोळ्या नाही पुऱ्या खा, अळूची भाजी ही ताटातून गायब! पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलची सद्य स्थिती
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीने संपूर्ण जगाला याचे परिणाम भोगावे लागत आहे. जागतिक स्तरावर इंधनाच्या पुरवठा साखळीवर झालेल्या परिणामामुळे इंधनाची मोठी टंचाई निर्माण झाली असून, याचा मोठा फटका पुण्याच्या प्रसिद्ध खाद्यसंस्कृतीला बसला आहे. शहरातील अनेक नामांकित हॉटेल्स आणि खानावळींमध्ये गॅसअभावी मोठे बदल करण्यात आले असून, काही ठिकाणी तर चक्क टाळे लावण्याची वेळ आली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल न्यु पुणा बोर्डींग हाऊसच्या मालकांची एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने घेतलेली मुलाखत व्हायरल होत आहे. पुण्यातील अनेक हॉटेल्समध्ये सध्या गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. पोळ्या तयार करण्यासाठी गॅसची शेगडी सतत मोठ्या आचेवर सुरू ठेवावी लागते, ज्यामध्ये इंधनाचा वापर अधिक होतो. यावर उपाय म्हणून अनेक हॉटेल व्यावसायिकांनी पोळ्या बनवणे तात्पुरते बंद केले असून ग्राहकांना ‘पुऱ्या’ खाव्या लागत आहेत. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पुऱ्या तळून घेतल्याने गॅसची बचत होत असल्याचे हॉटेल मालकांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर या संदर्भातील व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून खवय्यांमध्ये याची मोठी चर्चा आहे.
मेन्यू कार्डमधून अळूची भाजी ‘आऊट’
केवळ पोळ्याच नाही, तर पुणेकरांच्या आवडीची ‘अळूची भाजी’ देखील आता अनेक हॉटेल्सच्या मेन्यू कार्डमधून गायब झाली आहे. अळूची भाजी शिजवण्यासाठी आणि ती घोटण्यासाठी जास्त वेळ गॅसचा वापर करावा लागतो. इंधन वाचवण्यासाठी हॉटेल चालकांनी अशा भाज्या बनवणे थांबवले असून, त्याऐवजी कमी वेळात तयार होणाऱ्या साध्या भाज्या किंवा कडधान्यांच्या रश्श्याला प्राधान्य दिले जात आहे. यामुळे हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना आपल्या आवडत्या पदार्थांऐवजी उपलब्ध पर्यायांवरच समाधान मानावे लागत आहे.
इंधन टंचाईमुळे केवळ मेन्यू बदलला आहे असे नाही, तर अनेक ठिकाणी पदार्थांचे दरही वाढवण्यात आले आहेत. मर्यादित साधनसामग्रीत व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी हॉटेल चालकांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत असून पुणेकर खवय्यांमध्ये सध्या नाराजीचे सूर उमटत आहेत.
“जोपर्यंत गॅसचा पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत आम्हाला असे बदल करणे भाग आहे,” असे मत हॉटेलच्या मालकांनी व्यक्त केले आहे. युद्धाचा हा ‘आर्थिक आणि अन्नविषयक’ फटका कधी थांबणार आणि हॉटेल्समधील गजबज पुन्हा कधी पूर्वपदावर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.