अफवा पसरवू नका! मुंबई इंडियन्सच्या पहिल्याच सामन्यात सूर्या 'इम्पॅक्ट प्लेयर', हेड कोचने केला खुलासा
पाच वेळेचा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्सने रविवारी (२९ मार्च) कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत २०२६ च्या हंगामाला विजयी सुरूवात केली आहे. मुंबईने रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर २२१ धावांचे लक्ष्य ५ चेंडू शिल्लक राखत पार केले. त्या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी करत संघाचा १४ वर्षाचा पहिला सामना जिंकण्याचा दुष्काळ संपवला. या सामन्यात एक विशेष बाब घडली, ज्यामुळे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले.टी२० विश्वचषक विजेता भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मुंबईकडून खेळला.
या हंगामात रोहितला ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून मुंबईने खेळवणे टाळले आणि त्यामुळेच गोलंदाजीवेळी सूर्यकुमारला बाकावर बसावे लागले. त्याच्या बाबतीतच असे का घडले याचा खुलासा मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी केला आहे..
श्रीलंकेच्या माजी कर्णधाराने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमारच्या बाबतीत होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी म्हटले , “सूर्यकुमारच्या मांडीच्या स्नायूला किरकोळ दुखापत झाली होती आणि त्याला मैदानात उतरण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मला माहित आहे पुढील सामना पाच दिवसांनी आहे, मात्र मला त्याला सावरण्यासाठी अधिक वेळ द्यायचा होता. तो ३-४ षटके फिल्डिंग करण्यास तयार होता, पण मी नकार दिला. मला आशा आहे की यावर कोणत्या अनावश्यक चर्चा होणार नाही. तो एक महत्वाचा खेळाडू असून मी आणि संघ व्यवस्थापकांनी विचार करूनच हा निर्णय घेतला होता. यामागे कोणतेही दुसरे कारण नाही.”
सूर्यकुमारने कोलकाताविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याने ८ चेंडूत ३ चौकार मारत १६ धावा केल्या. त्याला कार्तिक त्यागीने रिंकू सिंगकरवी झेलबाद केले. तो रोहित बाद झाल्यानंतर फलंदाजीला आला होता. त्याला इम्पॅक्ट प्लेयर केल्याने चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधान आले होते. जयवर्धनेच्या स्पष्टीकरणानंतर त्यांना त्यांचे उत्तर मिळाल्याचे दिसते.
केकेआरविरुद्ध रोहितने ७८ आणि रिकल्टनने ८१ धावा केल्या. मुंबईने हा सामना १९.१ षटकात लक्ष्य पार करत ६ विकेट्सने जिंकला. त्याचबरोबर स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातील आपली १३ हंगामापासूनची पराभवाची मालिका खंडीत केली. मुंबईचा पुढील सामना ४ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे.
Comments are closed.