राजस्थान विरुद्ध चेन्नईने शेवटी कधी जिंकला सामना? मागील 5 सामन्यांत 4 पराभव, जाणून घ्या सर्व रेकॉर्ड्स
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ हंगामाचा तिसरा सामना आज (३० मार्च) राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दोन खेळाडू त्यांच्या मागील संघाविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. रवींद्र जडेजा राजस्थान तर संजू सॅमसन चेन्नईकडून खेळताना दिसणार आहेत. या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीची फलंदाजीही पाहण्यास चाहते आतुर आहे.
चेन्नईच्या संघातून नॅथन एलिस आधीच हंगामाबाहेर झाला आहे, यामुळे येथे त्याची चर्चा नसून दुसऱ्याच तीन खेळाडूंबाबत जाणून घेणार आहोत. या सामन्यातून बाहेर होणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिले नाव एमएस धोनी आहे. तो दुखापतीमुळे दोन आठवड्यांसाठी बाहेर झाला आहे. धोनीबरोबरच डेवाल्ड ब्रेविसही राजस्थानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर झाला आहे. तो साइड स्ट्रेनमुळे कमीत कमी दोन-तीन सामन्यांमध्ये खेळणार नाही. अशातच चेन्नई संकटात आला आहे. तसेच दोन्ही संघांची एकमेंकाविरूद्धची कामगिरी पाहिली तर राजस्थानचे पारडे जड आहे.
राजस्थान आणि चेन्नईमध्ये आतापर्यंत ३१ आयपीएलचे सामने खेळले गेले. त्यामध्ये चेन्नई १६ तर राजस्थानने १५ सामने जिंकले आहेत. यावरून दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली आहे. मागील पाच सामन्यांचे निकाल पाहिले तर राजस्थानचे वर्चस्व दिसले आहे. राजस्थानने चेन्नईविरुद्ध मागील पाच पैकी चार सामने जिंकण्याची कामगिरी केली आहे.
तसेच दोन्ही संघांमध्ये शेवटी खेळल्या गेलेल्या १० सामन्यांत चेन्नईने केवळ दोनच सामने जिंकले आहेत.चेन्नईला राजस्थानविरुद्ध शेवटी विजय २०२४ मध्ये मिळाला आहे. तसेच २०२५ मध्ये खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यात राजस्थानचा जिंकला होता. २०२४ च्या हंगामात चेन्नईने राजस्थानला ५ विकेट्सने पराभूत केले होते. त्याआधी २०२१ मध्येही चेन्नईने राजस्थानविरुद्धचा सामना जिंकला होता.
Comments are closed.