“रोहितचे '2.0 अवतार' विरोधी संघांसाठी धोक्याची घंटा”, माजी क्रिकेटपटूचे कौतुकास्पद वक्तव्य
आयपीएल २०२५ मध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळणाऱ्या रोहित शर्माने २०२६ च्या हंगामासाठी कठोर मेहनत घेतली. त्याचा उत्तम प्रभाव पहिल्याच सामन्यात दिसला. आयपीएलच्या १९ व्या हंगामात मुंबई इंडियन्सने त्यांचा पहिला सामना रविवारी (२९ मार्च) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला. यामध्ये मुंबईने रोहित आणि रायन रिकल्टनच्या स्फोटक फलंदाजीमुळे त्यांच्या सर्वोच्च लक्ष्याचा विजयी पाठलाग केला.
रोहितने या सामन्यात ३८ चेंडूत ७८ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट २०५.२६ राहिला. त्याची ही कामगिरी पाहून भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे म्हणाले, “रोहित शर्मा त्याच्या २.० अवतारात आला आहे, असे दिसते. त्याच्या या खेळीने सिद्ध होते की तो पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्यास सज्ज आहे. ज्याप्रकारे तो फलंदाजी करत होता, ते पाहून मला त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम दिवसांची आठवण झाली.”
“वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन आणि ब्लेसिंग मुझारबानी यांसारख्या गोलंदाजांना षटकार मारणे काही सोपे नाही, मात्र रोहितने ते सहज करुन दाखवले. विश्रांतीनंतर परतल्यावर लय आणि टायमिंग जुळवण्यासाठी पाच ते सहा दिवस लागतात, त्याने पहिल्याच सामन्यात ही धडाकेबाज खेळी करत त्याने आपल्या फिटनेसवर खूपच मेहनत घेतली आहे, असे दिसते. रोहितचे हे रुप विरोधी संघासाठी चिंतेचा विषय नक्की ठरेल,” असेही कुंबळे पुढे म्हणाले आहेत.
या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केकेआरने कर्णधार अंजिक्य रहाणेच्या अर्धशतकाच्या जोरावर २२० धावसंख्या उभारली. रहाणेने ६७ धावा केल्या. तसेच अंगकृष रघुवंशीने ५१ धावा केल्या.
प्रत्युत्तरात मुंबईने २२१ धावांचे लक्ष्य ६ विकेट्स आणि ५ चेंडू शिल्लक राखत पार केले. रायनने ८१ धावा केल्या. या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार शार्दुल ठाकुरला मिळाला. त्याने ४ षटकात ३९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
Comments are closed.