IPL 2026: आयपीएल 2026 मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा खेळ! ग्रीननंतर आता 'हा' खेळाडूही गोलंदाजी करणार नाही; संघात मोठी खळबळ

आयपीएल 2026 स्पर्धेचा थरार सुरू झाला असला, तरी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या काही नियमांमुळे आयपीएलमधील संघांचे मोठे नुकसान होत आहे. रविवारी (29 मार्च) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (MI vs KKR) सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार अष्टपैलू कॅमरन ग्रीनने (Camron Green) गोलंदाजी केली नाही. सामन्यानंतर जेव्हा कर्णधार अजिंक्य (Akjinkya Rahane) रहाणेला याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने “हा प्रश्न मला नाही तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विचारा,” असे सांगून स्पष्ट केले की ऑस्ट्रेलियन बोर्डानेच ग्रीनला गोलंदाजी करण्यापासून रोखले आहे.

केकेआरनंतर आता पंजाब किंग्सलाही असाच मोठा धक्का बसला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला अष्टपैलू कूपर कॉनोली (Kooper Conoly) याला पाठीच्या दुखापतीमुळे एप्रिल अखेरपर्यंत केवळ फलंदाज म्हणून खेळण्यास सांगितले आहे. याचा अर्थ कॉनोली या आयपीएल हंगामात सध्या गोलंदाजी करू शकणार नाही.

‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या रिपोर्टनुसार, कूपर कॉनोली आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तो प्लेइंग इलेवनमध्ये जोश इंग्लिसची जागा घेऊ शकतो आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मेडिकल टीमच्या सल्ल्यानुसार, पाठीच्या त्रासामुळे तो त्याच्या डाव्या हाताची फिरकी गोलंदाजी सध्या करणार नाही. पंजाब किंग्सचा या हंगामातील पहिला सामना 31 मार्च रोजी चंदीगडमध्ये शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे.

केवळ कॉनोलीच नाही, तर 25.20 कोटींची विक्रमी बोली लागलेला कॅमरन ग्रीनदेखील सध्या केवळ फलंदाज म्हणून खेळत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केकेआरला आधीच कल्पना दिली होती की, ग्रीन पुढील 10-12 दिवस गोलंदाजी करू शकणार नाही.

कोलकाता आणि पंजाब या दोन्ही संघांनी या खेळाडूंना त्यांच्या ‘ऑलराउंडर’ क्षमतेमुळे कोट्यवधी रुपये देऊन खरेदी केले होते, मात्र आता त्यांना केवळ फलंदाज म्हणून खेळवावे लागत असल्याने संघांसमोर अडचण निर्माण झाली आहे.

Comments are closed.