AIFF अध्यक्ष कल्याण चौबे वादाच्या भोवऱ्यात, महिला समितीच्या प्रमुखांनी केला छळाचा आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (AIFF) अध्यक्ष कल्याण चौबे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एआयएफएफच्या महिला समितीच्या प्रमुख वलन्का आलेमाव यांनी चौबे यांच्यावर छळ आणि अपमानास्पद वर्तणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. 29 मार्च रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा प्रकार घडल्याचे आरोप त्यांनी एका पत्राद्वारे केले आहे. यामुळे भारतीय फुटबॉल प्रशासनातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वलन्का आलेमाव यांनी कल्याण चौबे यांच्याबाबत धक्कादायक आरोप केले आहेत. कार्यकारी समितीच्या बैठकीदरम्यान कल्याण चौबे, उपाध्यक्ष एन. ए. हॅरिस आणि उप-सरचिटणीस एम. सत्यनारायण यांनी त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले. त्यांचे म्हणणे त्यांना मांडू न देण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यांच्याशी अत्यंत अनादरपूर्वक संवाद साधला गेल्याची माहिती आलेमाव यांनी पत्राद्वारे दिली.”अध्यक्षांनी माझा आवाज दाबण्यासाठी माझ्यावर ओरडून बोलण्याचा आणि मला घाबरवण्याचा प्रयत्न केला,” असा खळबळजनक आरोप आलेमाव यांनी आपल्या पत्रात केले आहेत.

वलन्का आलेमाव या हिंदुस्थानी क्रि़डा (फुटबॉल) क्षेत्रातील एक महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. त्या चर्चिल ब्रदर्स फुटबॉल क्लबच्या सीईओ असून गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांच्या कन्या आहेत. विशेष म्हणजे, फिफाच्या (FIFA) महिला फुटबॉल विकास समितीवर (2025-2029) नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या हिंदुस्थानी महिला ठरल्या आहेत. दरम्यान त्यांनी केलेल्या या आरोपांमुळे क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ऑस्ट्रेलियात खेळलेल्या आशियाई चषक स्पर्धेदरम्यान झालेल्या चुकांबद्दल आलेमाव यांनी यापूर्वीच अध्यक्षांना जाब विचारला होता. संघाचे व्यवस्थापन, नियोजनातील त्रुटी आणि महत्त्वाच्या निर्णयांमध्ये महिला समितीला विश्वासात न घेणे, अशा अनेक मुद्द्यांवरून आलेमाव आणि चौबे यांच्यात गेल्या काही काळापासून वाद सुरू होते.

दरम्यान या प्रकरणामुळे हिंदुस्थानी फुटबॉलमधील पारदर्शकता आणि कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना लोकशाही पद्धतीचा अवलंब न करता ते केवळ ठराविक लोकांकडून निर्णय लादले जात असल्याची टीका आलेमाव यांनी केली आहे. हिंदुस्थानात फुटबॉल प्रगतीपथावर असताना अशा प्रकारच्या अंतर्गत वादांमुळे खेळाच्या प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Comments are closed.