विमानाने येऊन मारायचा बँक खात्यावर डल्ला
एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकाच्या एटीएमची अदला बदली करून पैसे काढणाऱयास दिंडोशी पोलिसांनी अटक केली. संभवकुमार आचार्य असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 25 एटीएम कार्ड, दोन मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्याच्या अटकेने चार गुह्यांची उकल करण्यात दिंडोशी पोलिसांना यश आले आहे. संभवकुमार हा बँक खात्यावर डल्ला मारण्यासाठी ओडिशा येथून मुंबईत येत असायचा.
तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून ते मालाड येथे राहतात. फेब्रुवारी महिन्यात ते मालाड पूर्व येथील एका बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. एटीएममध्ये असताना एक जण तेथे आला. त्याने बोलबच्चन देऊन तक्रारदार याच्या एटीएम कार्डची अदलाबदली केली. एटीएमची अदलाबदली करून त्याच्या खात्यातून 40 हजार रुपये काढले. घडल्या प्रकरणी तक्रारदार याने दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दिंडोशी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.
तपासासाठी एक पथक तयार केले. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संभवकुमारला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 25 एटीएम कार्ड, दोन मोबाईल हस्तगत केले आहे. तो डल्ला मारण्यासाठी ओडिशा येथून विमानाने मुंबईत येत असायचा. तसेच त्याने गेल्या चार वर्षांत मुंबई, ठाणे, ओडिशा येथे अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
Comments are closed.