IPL 2026 – सूर्यवंशीच्या वादळात चेन्नई उडाली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बरसापारावर पावसाचे संकट होते, पण ते आज ओढवले नाही; मात्र वैभव सूर्यवंशी नामक 15 वर्षीय वादळाचा चेन्नईला तडाखा बसला. आज चेन्नईने घोर निराशा केली. पुन्हा तीच रडकथा घेऊन चेन्नई मैदानात उतरली. नवा हंगाम आणि संघात नवे चेहरे असले तरी चेन्नईने जुन्याच फलंदाजीच्या चुका केल्या. पॉवरप्लेमध्ये 41 धावांत 4 विकेट कोसळल्यानंतर चेन्नईने सामना गमावला होता. त्यानंतर त्यांचा संघ 127 धावांत आडवाही झाला. मग वैभव सूर्यवंशीने 15 चेंडूंत अर्धशतकी झंझावात आणत राजस्थान रॉयल्सला 47 चेंडू राखून महाविजय मिळवून दिला. 26 धावांत आघाडीचे दोन फलंदाज टिपणारा बर्गर ‘सामनावीर’ ठरला.

चेन्नईचा 127 धावांत खुर्दा पाडल्यानंतर या तुटपुंज्या धावांचा पाठलाग करताना वैभवला मॅट हेन्रीच्या पहिल्याच षटकात आपल्या पहिल्याच चेंडूवर जीवदान लाभले. कार्तिक शर्माने त्याचा झेल सोडला आणि चेंडू सीमापार. या जीवदानानंतर सूर्यवंशीचे वादळ घोंघावले आणि त्याने चेन्नईच्या गोलंदाजीला पह्डून काढले. 9 चेंडूंत 24 धावांवर असलेल्या वैभवने मग 4, 4, 0, 6, 6, 6 असे फटके खेळत 15 व्या चेंडूवर पन्नाशी गाठली. त्याने यशस्वी जैसवालच्या (ना 38)साथीने 75 धावांची सलामी देत संघाचा विजय निश्चित केला. त्याने 17 चेंडूंच्या खेळीत 5 षटकार आणि 4 चौकार खेचले.

चेन्नईचे पुन्हा तेच

गेल्या हंगामात अपयशी फलंदाजीमुळे चेन्नईचे आव्हान साखळीतच संपले होते. नव्या हंगामातही त्यांचे पाढे पंचावण्णच होते. गुवाहाटीच्या ओलसर खेळपट्टीवर राजस्थानने टॉस जिंकत गोलंदाजी घेतली आणि आर्चर-बर्गरने अचूक मारा करत चेन्नईचा कणा मोडला. चेन्नईसाठी सलामीला उतरलेला संजू 6 धावांवर बर्गरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. मग कर्णधार ऋतुराज गायकवाडचीही यष्टी जोफ्रा आर्चरने वाकवली. आयुष म्हात्रे शून्यावर बर्गरचा बळी ठरला आणि मॅथ्यू शॉर्टचीही विकेट काढत राजस्थानने पॉवर प्लेच्या 6 षटकांत चेन्नईचे काम तमाम केले. पुढे सरफराज खान (18), कार्तिक शर्मा (18) आणि शिवम दुबेही (6) चेन्नईला सावरू शकले नाहीत. तेव्हा जॅमी ओव्हरटनने 43 धावांची खेळी करत चेन्नईला 127 पर्यंत नेले.

Comments are closed.