IPL 2026 – आयपीएलमध्ये आज गिल-अय्यरची कसोटी, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स एकमेकाशी भिडणार
मुल्लानपूरच्या मैदानावर आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर आमनेसामने येणार आहेत. सध्या हिंदुस्थानी संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या या दोघांसाठी हा केवळ सामना नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी आहे. हिंदुस्थानच्या टी20 संघातून बाहेर पडलेले हे दोन्ही स्टार्स आता गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जची धुरा सांभाळत जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत.
हिंदुस्थानचा कसोटी-वनडे कर्णधार असलेल्या गिलला टी20 उपकर्णधारपद मिळाले, पण वर्ल्ड कप संघातून त्याला डावलण्यात आले. 2023 नंतर आयपीएलमध्ये विराट कोहलीनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या गिलकडून आता वेगवान फलंदाजीची अपेक्षा आहे. गेल्या हंगामात 155 स्ट्राइक रेटने खेळणाऱ्या गिलवर प्रशिक्षक मॅथ्यू हेडनची खास नजर असेल.
दुसरीकडे, अय्यर-तीन वेगवेगळ्या संघांना फायनलमध्ये नेणारा कर्णधार आहे. तरीही हिंदुस्थानच्या टी20 संघात त्याला स्थान नाही. गेल्या सत्रात 175 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 604 धावा करत अय्यरने आपली ताकद दाखवली आहे.
पंजाब किंग्ज ः श्रेयस अय्यर (कर्ंधर), निहाल वढेरा, विष्णू विनोद, हरनूर पन्नू, प्रभसिमरन सिंग, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, हरप्रीत ब्रार, मार्कस जॉन्सन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, प्रियांश आर्य, सूर्यांश शेडगे.
गुजरात टायटन्स ः शुभमन गिल (कर्ंधर), साई सुदर्शन, जोस बटलर, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, कागिसो रबाडा, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा.
दोन्ही संघांची ताकद आणि टक्कर
गुजरातसाठी गिल-साई सुदर्शन ही सलामी जोडी सर्वात मोठा आधार आहे. सुदर्शनने मागील हंगामात 759 धावा ठोकल्या होत्या. राशिद खानच्या नेतृत्वाखालील फिरकी हल्ला प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. पंजाबची ताकद त्यांचे हिंदुस्थानी खेळाडू प्रभसिमरन, प्रियांश, निहाल वढेरा, शशांक सिंह हे आहेत. मात्र त्यांना गुजरातच्या भेदक गोलंदाजीचा सामना करावा लागणार आहे.
Comments are closed.