महाराष्ट्रात अमली पदार्थांविरोधात लढा – मुख्यमंत्री

राज्यात अमली पदार्थांविरुद्ध मोठी लढाई सुरू केली जाणार आहे. यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक नवीन रणनीती तयार करीत आहेत. शाळा-महाविद्यालयांना अमली पदार्थमुक्त करण्यासाठी ‘ड्रग्ज फ्री कॅम्पस’ मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद मुंबईत पार पडली. या परिषदेनंतर प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी नक्षलवाद निर्मूलन, पोलिसिंगमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर, राज्यातील अपराध सिद्धीचा दर आणि ड्रग तस्करीविरोधातील मोठय़ा कारवाईची माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी अमली पदार्थांच्या विरोधात मोठय़ा लढाईची घोषणा केली. शैक्षणिक संस्थांमध्ये अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. महाविद्यालयीन परिसर पूर्णपणे ड्रगमुक्त ठेवण्यावर भर दिला जाणार असल्याचे फडणवीस यांनी संगितले.

अपराध सिद्धीचा दर वाढवणार

कायदेशीर प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून एफआयआर नोंदणीपासून आरोपपत्र आणि ट्रायलपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सहा महिन्यांत डिजिटल  करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुराव्यांची सुरक्षितता राखण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. तसेच मागील 4-5 वर्षांतील अपयशी ठरलेल्या गुन्हे प्रकरणांचे विश्लेषण करण्यासाठी सीआयडीला एआय टूल्स वापरण्याचे निर्देश देण्यात आले असून सध्याचा 50 टक्के अपराध सिद्धीचा दर 90  टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट  देण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

बांगलादेशींना शोधणारे ‘टूल’

बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेऊ शकेल असे ‘टूल’ लवकरच विकसित करण्यात येणार आहे. आयआयटी मुंबईचे संशोधन सुरू आहे. या टूलची चाचणी पूर्ण झाल्यानंतर ते प्रत्यक्ष वापरात आणली जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी राजेवार

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सातारा पालकमंत्री शंभुराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी वादग्रस्त ठरलेले जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी रजेवर गेले आहेत, याविषयी फडणवीस यांना विचारले असता चौकशीवर परिणाम होऊ नये यासाठी दोशी रजेवर गेल्याचे त्यांनी सांगितले.

माओवादापासून मुक्त राज्य

महाराष्ट्रातून नक्षलवाद संपवण्यात सी-60 दलाचे योगदान मोठे आहे. राज्यातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या परिषदेत महाराष्ट्र पोलिसांचे काwतुक केले. तसेच या लढय़ात शहीद झालेल्या 244 जवानांना फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Comments are closed.