भोंदूबाबाला कोठडीत हवंय भस्म, कुंकू, जपमाळ! न्यायालयाने मागणी अर्ज फेटाळला
आपण देवाचा अवतार असल्याचे सांगून महिलेला गुंगीकारक औषध देत तिच्यावर अत्याचार करणाऱया भोंदू ऋषिकेश वैद्य याला न्यायालयाने दणका दिला आहे. पोलीस कोठडीत असताना पूजा करण्यासाठी पूजा साहित्य मिळावे म्हणून वैद्य याने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक येथील अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असल्याने अवघ्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच पुण्यात घडलेल्या या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर पीडितेशी ओळख झाल्यावर मी देवाचा अवतार असून, तू माझी पत्नी आहेस. देवाची उपासना कशी करायची हे मी शिकवतो असे सांगून पीडितेला एका लॉजवर नेत तिला गुंगीकारक औषध देत तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, आपण धार्मिक गुरू असून, नित्य पूजेसाठी ताम्हण, पळी, पंचपात्र, आसन, धार्मिक पूजा पुस्तक, भस्म, कुंकू, जपमाळ आदी साहित्य मिळावे, असा अर्ज वैद्य याने ऍड. साजिद शहा, ऍड. पवन कुलकर्णी, ऍड. रामजी कोथली यांच्यामार्फत केला होता. मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे सरकारी वकील आणि तपास अधिकाऱयांनी या अर्जाला विरोध केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने अर्ज फेटाळला.
शनिवारी वैद्य याला न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी पूजा साहित्य मिळावे म्हणून त्याने अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने अर्ज दाखल करून न घेता साहित्य उपलब्ध करून देण्याच्या तोंडी सूचना तपास अधिकाऱयांना दिल्या होत्या. मात्र, पोलिसांनी साहित्य दिले नसल्याने बचाव पक्षाने हा अर्ज न्यायालयात सादर केला. मात्र, न्यायालयाने अर्ज फेटाळला, असे ऍड. शहा यांनी सांगितले.
Comments are closed.