आंध्रमध्ये नऊ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले
36 वर्षांपासून लपून बसलेल्या सूत्रधार सुरेशचा समावेश
वृत्तसंस्था/ विजयवाडा
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे नऊ नक्षलवाद्यांनी एकाचवेळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याने सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. आत्मसमर्पण केलेल्या या नक्षलवाद्यांमध्ये अनेक दशकांपासून पोलिसांना चकमा देत असलेला सर्वोच्च माओवादी कमांडर चेलुरी नारायण राव उर्फ सुरेश हा सर्वात प्रमुख आहे. या शरणागतीनंतर राज्यातील नक्षलवादी कारवाया जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत, असे पोलीस महासंचालक हरीश कुमार गुप्ता यांनी सांगितले. नक्षलवाद्यांच्या या आत्मसमर्पणादरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आधुनिक आणि प्राणघातक शस्त्रसाठा जप्त करण्यात लक्षणीय यश मिळवले.
आंध्र प्रदेशमधील नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाच्या बातमीने देशाचे लक्ष वेधले आहे. ही घटना शांततेच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. या प्रकरणात सामील असलेल्या कमांडरवर अनेक गंभीर गुन्हेगारी आरोप आहेत. सुरेशचा गुन्हेगारी इतिहास खूप गंभीर असून आंध्र प्रदेश आणि ओडिशामधील अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. 2018 मध्ये माजी आमदार किदारी सर्वेश्वर राव आणि माजी आमदार शिवरी सोमेश्वर राव यांच्या निर्घृण हत्याकांडात त्याला मुख्य आरोपी म्हणून संबोधण्यात आले होते. पोलीस दलांवरील अनेक हल्ल्यांमध्येही त्याचा प्रमुख सहभाग असल्याचे समोर आल्यामुळे तो सुरक्षा दलांसाठी एक मोठी डोकेदुखी बनला होता.
Comments are closed.