उद्यापासून देशात जनगणना सुरू होणार आहे

पहिल्या टप्प्यासाठी 33 प्रश्न निश्चित : ऑनलाइन पोर्टलवर माहिती सादर करता येणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत सरकार 1 एप्रिलपासून देशाची पहिली डिजिटल जनगणना सुरू करत आहे. 2011 नंतरची ही पहिली आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना असेल. ही जनगणना दोन टप्प्यांत घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि इतर माहिती गोळा केली जाईल. दुसरा टप्पा प्रत्यक्ष जनगणनेचा असेल. पहिला टप्पा 1 एप्रिलपासून सुरू होऊन 30 सप्टेंबर 2026 पर्यंत चालेल. पहिल्या टप्प्यात घरांची यादी तयार करून त्यांची गणना केली जाईल. घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा आणि घरातील वस्तू याविषयी माहिती गोळा केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक आणि आर्थिक माहितीसाठी एक आराखडा तयार केला जाईल.

जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिलपासून सुरू होत असून त्यामध्ये 33 प्रश्न विचारले जातील. यानुसार, स्थिर नातेसंबंधात असलेल्या लिव्ह-इन जोडप्यांनाही विवाहित मानले जाण्याची महत्वाची नोंद करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी एक ऑनलाइन पोर्टलही सुरू करण्यात आले असून तेथे लोक स्वत:ची माहिती भरू शकतात. या टप्प्याला ‘घर सूची आणि गृहगणना’ असे संबोधण्यात आले आहे. देशातील गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांबद्दल माहिती गोळा करणे हा याचा उद्देश आहे. दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची सविस्तर माहिती गोळा केली जाईल.

केंद्रीय गृह मंत्रालयाने 8 जानेवारी रोजी जाहीर केल्यानुसार, 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान पार पडेल. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश हे काम 30 दिवसांत पूर्ण करेल. यावेळी जनगणना पूर्णपणे डिजिटल असेल. अंदाजे 30 लाख कर्मचारी एका मोबाईल अॅपद्वारे माहिती गोळा करतील. मोबाईल अॅप, पोर्टल आणि रिअल-टाइम डेटा ट्रान्सफरमुळे जनगणना मोठ्या प्रमाणात कागदविरहित होईल. हे अॅप्स अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हीवर चालतील. जातीसंबंधित माहितीदेखील डिजिटल पद्धतीने गोळा केली जाईल. स्वातंत्र्यानंतर प्रथमच जनगणनेत जात जनगणनेचा समावेश केला जाईल.

कोणते प्रश्न विचारले जातील?

पहिल्या टप्प्यात, घर आणि कुटुंबाशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती गोळा केली जाईल. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

घराचा क्रमांक आणि रचना

फरशी, भिंती आणि छतासाठी वापरलेले साहित्य

घराची स्थिती आणि वापर

कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या

विवाहित जोडप्यांची संख्या

कुटुंबप्रमुखाचे नाव, लिंग आणि सामाजिक वर्ग

खाण्याच्या सवयी, सेवन केले जाणारे धान्य

वाहने आणि इतर सुविधांची उपलब्धता

लिव्ह-इन जोडप्यांना विवाहित मानण्याची तरतूद

2027 च्या भारतीय जनगणनेत एक अत्यंत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. हा बदल लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांशी संबंधित आहे. विवाहाशिवाय एकत्र राहणारी आणि आपले नाते कायमस्वरूपी किंवा स्थिर मानणारी जोडपी जनगणनेदरम्यान विवाहित जोडपे म्हणून नोंदवली जातील. हा निर्णय समाजाच्या बदलत्या स्वरूपाला मान्यता देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. सदर जोडप्यांना वेगळ्या श्रेणीत ठेवण्याऐवजी विवाहित जोडप्यांच्या यादीत समाविष्ट केले जाईल.

माहिती भरण्यासाठी काय आवश्यक आहे?

2027 च्या जनगणनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्या म्हणजे केवळ व्यक्तीने दिलेली माहितीच अंतिम आणि अचूक मानली जाईल. जर एखाद्या जोडप्याला आपण लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर करून विवाहित जोडपे म्हणून नोंदणी करायची असेल, तर त्यांना कोणतेही कायदेशीर दस्तऐवज, विवाह प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र दाखवण्याची आवश्यकता नाही. जनगणना अधिकारी कोणताही पुरावा मागणार नाहीत. तुम्ही स्वत: पोर्टलवर भरलेली माहिती किंवा तुमच्या घरी भेट देणाऱ्या कर्मचाऱ्याला दिलेली माहिती नोंदवली जाईल. ही प्रक्रिया पूर्णपणे विश्वास आणि स्वघोषणेवर आधारित आहे.

Comments are closed.