सीएसकेविरुद्धच्या सामन्यात जड्डू झाला भावूक! रडतानाचा व्हिडिओ व्हायरल
आयपीएल २०२६ च्या हंगामात सोमवारी (३० मार्च) गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर आपल्या आधीच्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाविरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून खेळताना रवींद्र जडेजाच्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्टपणे दिसत होते. सामन्याच्या नवव्या षटकात सीएसकेची स्थिती ६० धावांवर ६ विकेट्स अशी असताना स्टेडियमवर सीएसके, सीएसके चा घोष सुरू होता, तेव्हा सीमरेषेजवळ थांबलेल्या जडेजाच्या डोळ्यात अश्रू दिसले. त्या भावनिक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
राजस्थानच्या २००८ च्या आयपीएल विजेत्या संघाचा भाग असलेल्या जडेजा २०१२ मध्ये सीएसकेमध्ये सामील झाला. त्यांनतर तो एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली संघाचा प्रमुख भाग बनला. त्याने सीएसकेसोबत २०१८, २०२१ आणि २०२३ च्या विजेतेपदांमध्ये महत्वाची कामगिरी केली होती. २०२६ च्या हंगामाआधी तो ट्रेडद्वारे राजस्थानमध्ये परतला.
एक दशकाहून अधिक काळ एका संघासोबत घालवताना आणि आता त्याच संघाविरुद्ध खेळताना जडेजा भावूक झालेला दिसला. त्याने या सामन्यात २ विकेट्स घेत राजस्थानमध्ये चांगले पुनरागमन केले. त्याने ३ षटकात १८ धावा देत इम्पॅक्ट प्लेयर सरफराज खान आणि शिवम दुबे यांच्या विकेट्स घेतल्या.
जडेजासाठी हा बदल सोपा नव्हता, मात्र तो नव्या संघात येऊन आनंदी आहे. तो म्हणाला, “मला वाटते की, गुलाबी रंग माझ्यावर छान दिसतो. खेळपट्टी थोडी कठीण होती आणि चेंडू वळत होता. मला गोलंदाजी करताना खरोखरच खूप मजा आली. माझे काम फक्त चेंडू योग्य जागी टाकणे हे होते, बाकीचे काम खेळपट्टीने केले.”
या सामन्यात राजस्थानचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय नांद्रे बर्गर आणि इतर गोलंदाजांनी योग्य ठरवला, कारण सीएसकेने १९.४ षटकात सर्व विकेट्स गमावत १२७ धावा केल्या. त्यामध्ये सीएसकेकडून जेमी ओव्हरटन याने सर्वाधिक ४३ धावा केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, बर्गर आणि जडेजा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जायसवाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी आक्रमक सुरूवात केली. जायसवाल ३८ धावा करत नाबाद राहिला. वैभवने १७ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकार मारत ५२ धावा केल्या. त्यामुळे आरआरने केवळ १२.१ षटकात लक्ष्याचा विजयी पाठलाग केला. हा सामना त्यांनी ८ विकेट्सने जिंकला.
Comments are closed.