चोपड्यात बिबट्याने आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकलीचा घेतला बळी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मामलदे गावात एक हृदयद्रावक आणि अंगावर शहारे आणणारी घटना घडली असून, दोन महिन्यांच्या निष्पाप बालिकेला हिंस्त्र प्राण्याने आईच्या कुशीतून उचलून नेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मागील काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरले आहे. रात्री शेतात कुटुंबासह वास्तव्य करणाऱ्या काठेवाडी कुटुंबातील ही बालिका आईच्या कुशीत खाटेवर शांत झोपलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळी कुटुंबीय जागे झाल्यानंतर आईजवळ बालिका दिसून न आल्याने एकच खळबळ उडाली. घाबरलेल्या आई-वडिलांसह गावकऱ्यांनी शेत परिसरात तातडीने शोधमोहीम सुरू केली. काही वेळाने राहत्या ठिकाणापासून काही मीटर अंतरावर गव्हाच्या कुट्टीजवळ बालिकेच्या अवशेषांचे तुकडे आढळून आले, ज्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या डोळ्यांसमोर असलेलं लेकरू क्षणार्धात हिरावलं गेल्याने आईच्या हंबरड्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, या अमानुष घटनेमुळे गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तर मनात संताप उसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील आणि पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह पोलीस व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात बिबट्यानेच हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चोपडा तालुक्यात यापूर्वीही बिबट्याच्या हल्ल्यांत जनावरांचे बळी गेले असताना आता प्रथमच मानवी जीवितहानी झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments are closed.