Mumbai News – भंगारच्या वादातून मजुराची क्रूर हत्या, आरोपीला पोलिसांकडून अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भंगारच्या वादातून एका मजुराची सहकाऱ्यानेच हातोड्याने वार करून हत्या केल्याची घटना मुंबईतील परेल परिसरात घडली. राजीव कुमार उर्फ पहाडीकुमार यादव असे हत्या झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. परेल येथील महात्मा गांधी रुग्णालयाच्या आवारात ही धक्कादायक घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामजीकुमार प्रभू राऊत आणि पीडित राजीव कुमार दोघेही मूळचे बिहारचे रहिवासी होते. कामानिमित्त दोघे मुंबईत आले होते. ते रोजंदारीवर मजूर म्हणून काम करत होते. एमजीएम रुग्णालयातील एका स्टोरेज रुममध्ये ते अन्य सहकाऱ्यांसोबत राहत होते. यादवने भंगारमधील वायर लपवून ठेवल्याचा संशय राऊतला होता. या संशयातून 30 मार्च रोजी मध्यरात्री 12.15 ते 12:30 च्या सुमारास भांडण झाले.

रागाच्या भरात राऊतने जवळच असलेला हातोडा उचलला आणि यादवच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला यादवचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments are closed.