Rain in Summer Season: अचानक आलेल्या पावसात काय काळजी घ्यावी?

कडक उन्हाळ्याच्या दिवसात अचानक जर पाऊस पडू लागला तर तो सर्वांनाच हवाहवासा वाटू लागतो. असा पाऊस हवेत गारवा निर्माण करतो. अनेक जण या अचानक आलेल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी त्यात मनसोक्त भिजतात. टपोरे थेंब अंगावर झेलत मजामस्ती करतात. मात्र अशा या अवकाळी पावसात भिजणे थोडे धोकादायक ठरू शकते. याकरताच आपली वडीलधारी मंडळीदेखील आपल्याला नेहमीच सावध राहण्याचा आणि पावसात न भिजण्याचा सल्ला देत असतात. कारण उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसात भिजल्यामुळे तब्येत बिघडण्याचा धोका अधिक असतो. यामागे अनेक कारणे आहेत. अशा या अवकाळी पावसात आपण आपली नेमकी काळजी कशी घ्यावी याविषयी जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात शरीराचे तापमान आधीच उष्ण असते. जेव्हा अचानक थंड पावसाचे पाणी अंगावर पडते, तेव्हा शरीराच्या तापमानात झपाट्याने बदल होतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती तात्पुरती कमकुवत होते आणि सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा समस्या होऊ शकतात. पावसामुळे साचलेल्या पाण्यामध्ये डास वाढतात, जे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांना आमंत्रण देतात.

उन्हाळ्याच्या अवकाळी पावसात वातावरणातील धूळ, प्रदूषण आणि हानिकारक रसायनं हवेत मिसळतात. त्यामुळे असे रसायन मिश्रित पाणी त्वचेवर पडल्यास खाज, एलर्जी किंवा डोळ्यांत जळजळ यांसारखे त्रास उद्भवू शकतात.

पावसात भिजल्यानंतर जर तुम्ही भिजलेल्या कपड्यांमध्येच अधिक वेळ राहिलात, तर शरीर थंड होऊन सर्दी, ताप किंवा अंगदुखी होण्याची शक्यता वाढते. याशिवाय, अशा भिजलेल्या अवस्थेत जास्त वेळ राहिल्याने फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो, विशेषतः पायाच्या बोटांमध्ये, काखेत आणि इतर संवेदनशील भागांत.

अचानक आलेल्या पावसाळ्यात काय काळजी घ्याल?

1. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी सोबत ठेवा.
2. बाहेरचे उघड्यावरचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाणे टाळा.
3. मे आणि जूनमध्ये वातावरणीय बदलांमुळे त्वचेवर देखील परिणाम होतो यामुळे त्वचा क्लिनझींग, मॉइश्चरायझिंग सोबत ठेवा.
4. बाहेरून फळे आणि भाज्या आणल्यानंतर सर्वप्रथम धुवून घ्या.
5. अचानक होणाऱ्या हवामान अंदाज लक्षात घेऊन छत्री, रेनकोट किंवा जॅकेट कायम जवळ बाळगा
6. रोज नियमित व्यायाम करत राहा. व्यायाम केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
7. हवामान तसेच पर्यावरणीय बदलांमुळे घाबरून जाऊ नका. तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. यासाठी घरच्यांच्या व मित्रमैत्रिणीच्या संपर्कात राहा.
8. त्वचेवर कुठलीही अ‍ॅलर्जी, लालसरपणा, जळजळ किंवा खाज जाणवली, तर ती दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
9. भिजल्यानंतर लगेचच एसीच्या थंड हवेत जाणं टाळावं, कारण शरीर आधीच थंड झालेलं असतं आणि अशा वेळी पुन्हा थंडीचा सामना केल्यास ताप किंवा अंगदुखी होऊ शकते.
10. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी गरम पाणी प्यावे, किंवा गरमागरम सूप, हळद-दूध, किंवा लिंबू-हळदीचा काढा घ्यावा. अती थंडी वाटल्यास आले, तुळस, हळद, मिरे यांचा काढा उपयोगी ठरू शकतो.

Comments are closed.