सीएसके विरुद्ध 2 विकेट्स घेत रवींद्र जडेजाचा मोठा पराक्रम; लसिथ मलिंगाला टाकले मागे!
आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने पहिल्याच सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. ३० मार्च रोजी आपल्या जुन्या संघाविरुद्ध म्हणजेच चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (CSK) उत्कृष्ट गोलंदाजी करत जडेजाने २ बळी घेतले आणि आयपीएलमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. या बाबतीत त्याने श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा विक्रम मोडीत काढला आहे.
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यात रवींद्र जडेजाने आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत लसिथ मलिंगाला मागे टाकले. जडेजा आता आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा ९वा गोलंदाज ठरला आहे. CSK विरुद्धच्या सामन्यात जडेजाने शिवम दुबे आणि सरफराज खान या दोघांना बाद करून हे यश मिळवले.
या दोन विकेट्ससह जडेजाच्या नावावर आता आयपीएलमधील २५५ सामन्यांत १७२ विकेट्स झाल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ३०.२६ असून त्यात एकदा पाच विकेट्स घेण्याच्या पराक्रमाचाही समावेश आहे. दुसरीकडे, मलिंगाच्या नावावर आयपीएलमध्ये १७० विकेट्स आहेत. दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आजही युझवेंद्र चहलच्या नावावर आहे.
२००८ मध्ये जडेजा राजस्थान रॉयल्सच्या विजेत्या संघाचा भाग होता. त्यानंतर २०१२ मध्ये तो CSK शी जोडला गेला आणि एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली संघाचा महत्त्वाचा खेळाडू बनला. २०१८, २०२१ आणि २०२३ मध्ये CSK ला चॅम्पियन बनवण्यात त्याने मोठी भूमिका बजावली. आयपीएल २०२६ पूर्वी झालेल्या मोठ्या ‘ट्रेड’मध्ये जडेजा पुन्हा राजस्थानमध्ये परतला, सोबत सॅम करनही संघात सामील झाला, तर संजू सॅमसन CSK मध्ये गेला.
आयपीएल २०२६ च्या तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पाच वेळच्या चॅम्पियन CSK चा ८ विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना जडेजा, जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांच्या भेदक गोलंदाजीसमोर CSK ची फलंदाजी कोलमडली. CSK ने ५७ धावांत ६ गडी गमावले होते, मात्र जेमी ओव्हरटन (४३), कार्तिक शर्मा (१८) आणि सरफराज खान (१७) यांच्या खेळीमुळे संघ १२७ धावांपर्यंत पोहोचला.
विजयाचा पाठलाग करताना राजस्थानने तुफानी सुरुवात केली. वैभव सूर्यवंशीने अवघ्या १७ चेंडूत ५२ धावा कुटल्या, ज्यामध्ये ४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. यशस्वी जयस्वालने ३८ धावांची नाबाद खेळी खेळली आणि या दोघांच्या ७५ धावांच्या भागीदारीमुळे राजस्थानने सहज विजय मिळवला.
Comments are closed.