निवृत्तीच्या चर्चांवर मोहम्मद शमीने सोडलं मौन! म्हणाला.., असं घडल्यास क्रिकेट सोडून देईन
भारतीय क्रिकेट संघाबाहेर असलेला अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohmmed Shami) अखेर आपल्या भवितव्याबद्दल आणि निवृत्तीच्या (Retirement) चर्चांबाबत मौन सोडले आहे. घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही संघात स्थान न मिळाल्याने शमी चर्चेत होता, परंतु त्याने स्पष्ट केले आहे की, सध्या त्याचा निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या शमीचा टीम इंडियातील मार्ग सध्या कठीण दिसत आहे. दुखापतींमुळे त्याच्या कारकिर्दीवर परिणाम झाला आहे. घरेलु क्रिकेटमध्ये 67 विकेट्स घेऊनही निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, इंग्लंड दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला होता, पण त्याने खेळण्यास नकार दिल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. आता आयपीएल 2026 मध्ये शमी लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसेल, ज्यांनी त्याला 10 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील केले आहे.
शुभांकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना शमी म्हणाला की, ज्या दिवशी मला स्वतःला वाटेल की आता मन लागत नाहीये, त्याच दिवशी मी क्रिकेटला निरोप देईन. जोपर्यंत मी खेळण्याचा आनंद घेत आहे, तोपर्यंत निवृत्तीचा विचारही करणार नाही. असे विचार तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करतात. ज्या दिवशी सकाळी उठल्यावर मला कंटाळा येईल किंवा आळस जाणवेल, तोच माझा क्रिकेटमधील शेवटचा दिवस असेल. पण सध्या मला ना कंटाळा आलाय, ना मी थकलोय.
शमीने सांगितले की, तो मैदानावर नेहमीच आपले 100 टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करेल. लखनऊ संघाने त्याच्यावर दाखवलेला विश्वास तो सार्थ ठरवण्यासाठी सज्ज आहे. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘समाधान’. त्याने घरेलु क्रिकेट किती खेळले यापेक्षा त्याची लय (Rhythm) कशी आहे, यावर तो जास्त लक्ष केंद्रित करत आहे.
Comments are closed.