Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्या कॉफी विथ कौशिक या विशेष कार्यक्रमात विविध मुद्यांवर संवाद साधला. या संवादात सुनील तटकरे यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, अजित पवारांसोबतची मैत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेससमोरील आव्हान यांच्यावर विविध मुद्यांवर भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भातील माहिती होतं, माझा त्याला विरोध नव्हता असं सुनील तटकरे म्हणाले. 

अजितदादा गेल्यानंतरची आव्हानं कोणती?

अजित पवारांच्या 1999 पासूनच्या 22 जुलैच्या वाढदिवसाला मी नाही असं कधी झालं नाही. आता यावेळी मात्र मनाला वेदना होतील. 2026 ला 22 जुलैला वेदना होतील, दादांना जाऊन शुभेच्छा द्यायला ते नाहीत, हे कमालीचं दु:खद आहे, असं सुनील तटकरे म्हणाले. 

अजितदादांच्या निधनानंतर स्वत:च्या मनाला सावरणं हे आव्हान होतं. अजितदादांनी जो विचार दिला तो अढळ निश्चयानं पुढं चालू ठेवणं हे आव्हान आहे. पक्षासाठी दादांच्या नंतर काय असा प्रश्न आहे. दादा गेले हे आयुष्यभर विसरता येत नाही, पण गेले ते सत्य आहे, वास्तव आहे. त्या ठिकाणी उत्तराधिकारी आलाच. जबाबदारीचं भान ठेवत मला आणि सहकाऱ्यांना वाटलं की सुनेत्रा वहिनी याच अजितदादांच्या उत्तराधिकारी असतील.  

अजितदादांना सुनेत्रावहिनींनी दीर्घकाळ साथ दिली आहे, ती आम्ही लक्षात घेतली आणि वहिनींसोबत चर्चा केली. विधिमंडळ पक्षाचा नेता निवडणं, शपथविधीची प्रक्रिया पूर्ण करणं मुख्यमंत्र्यांची मान्यता घेणं, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मान्यता घेणं  हे करणं गरजेचं होतं. हे मी एकट्यानं केलं असं नाही,  प्रफुल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आम्ही सर्वांनी केलं.

Comments are closed.