Ratnagiri News – टॉवर गावाला अन् रेंज नाही नावाला! दापोलीतील कळंबट परिसरात नागरिक नेटवर्कअभावी हैराण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दापोली तालुक्यातील कळंबट गावात बीएसएनएल (BSNL) कंपनीने मोबाईल टॉवर उभा केला खरा, मात्र प्रत्यक्षात या टॉवरचा लाभ ग्राहकांना मिळत नसल्याचे चित्र आहे. ‘टॉवर गावाला अन् रेंज नाही नावाला…’ अशी अवस्था कळंबटसह परिसरातील गावांची झाली असून, मोबाईलधारक नेट कनेक्टिव्हिटीअभावी पूर्णपणे हैराण झाले आहेत.

सध्याच्या युगात मोबाईल आणि इंटरनेट जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र, ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने अनेक महत्त्वाची कामे रखडली आहेत.

इंटरनेटअभावी खालील क्षेत्रांवर मोठा परिणाम होत आहे:

  • शासकीय कामे: तलाठी कार्यालयातून सात-बारा, आठ-अ उतारा काढणे, ग्रामपंचायत स्तरावरील ऑनलाइन कामे.
  • बँकिंग व व्यवहार: बँका, पोस्ट, पतसंस्थांमधील आर्थिक व्यवहार आणि ऑनलाइन पेमेंट.
  • स्वस्त धान्य दुकान: रेशन दुकानातील बायोमॅट्रिक मशीनला रेंज नसल्याने धान्याची उचल करण्यात अडचणी.
  • शिक्षण: शाळांमध्ये ई-लर्निंग आणि प्रोजेक्टरद्वारे शिकवताना इंटरनेटचा अडथळा.

गावात टॉवर असूनही नेट चालत नसल्याने ग्राहकांचा संताप अनावर होत आहे. अनेक नागरिक महागड्या किमतीचे रिचार्ज करतात, परंतु नेटवर्कअभावी ते रिचार्ज कोणत्याही उपयोगाविना वाया जात आहे. जर चुकून रेंज मिळालीच, तर समोरच्या व्यक्तीचा आवाज स्पष्ट ऐकू येत नाही, अशा तक्रारी नागरिक करत आहेत. व्यावसायिक माहिती, शेअर बाजार, प्रवासाचे बुकिंग आणि नातेवाईकांशी संपर्क साधणे यांसारख्या साध्या गोष्टींसाठीही कळंबटवासीयांना कसरत करावी लागत आहे. बीएसएनएल प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन टॉवरची तांत्रिक क्षमता सुधारावी आणि अखंडित सेवा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Comments are closed.