मुंबई इंडियन्सची खेळाडू चमकली; न्यूझीलंडचा नवा इतिहास, दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धुळ चारत टीम इंडियाचा विक्रम मोडला
न्यूझीलंड महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात अशक्य वाटणारा विजय मिळवत क्रिकेट इतिहासात सुवर्णअक्षरांनी आपले नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 348 धावांचे डोंगराएवढे आव्हान न्यूझीलंडने यशस्वीरित्या पार केले. या विजयासह न्यूझीलंडने 2025 च्या विश्वचषकात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या 339 धावांच्या पाठलागाचा विक्रम मोडीत काढला असून, महिला एकदिवसीय क्रिकेटमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला आहे.
या ऐतिहासिक विजयाची शिल्पकार ठरली ती कर्णधार अमेलिया केर. सलामीची फलंदाज सुझी बेट्स स्वस्तात बाद झाल्यानंतर आणि संघ 130 धावांवर 4 बाद अशा अडचणीत असताना केरने डावाची सूत्रे हाती घेतली. तिने अवघ्या 139 चेंडूत 23 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 179 धावांची विस्मयकारक खेळी केली. केरला इझाबेला गझने (68 धावा) मोलाची साथ दिली; या दोघांनी केवळ 81 चेंडूत 120 धावांची भागीदारी करून सामन्याचे पारडे न्यूझीलंडच्या बाजूने झुकवले. केरनेच विजयी चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना लौरा वोल्वार्ड आणि आन्नेके बोश यांच्यातील 132 धावांच्या भागीदारीच्या जोरावर 347 धावांचा डोंगर उभा केला होता. क्लो ट्रायॉनने अखेरच्या षटकांत 25 चेंडूत 52 धावांची तुफानी फटकेबाजी करत आफ्रिकेला मोठी धावसंख्या गाठून दिली होती. मात्र, अमेलिया केरच्या जिद्दीपुढे आफ्रिकेचे हे आव्हान अपुरे पडले. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
Comments are closed.