Israel Iran War – ट्रम्प यांच्या घोषणेमुळे तेलाचा भडका; कच्च्या तेलाच्या किमती 105 डॉलरवर
अमेरिका, इस्रायल इराण यांच्यातील युद्ध थंडावण्याचे संकेत दोन दिवसांपुर्वी मिळत होते. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सवयीप्रमाणे यु टर्न घेतला आहे. त्यांनी त्यांच्या संबोधनात स्पष्ट केले की, आम्ही इराणला कधीही अणुशक्ती बनू देणार नाही. आम्ही त्यांच्यासोबत कोणताही करार करणार नाही. आम्ही २ ते ३ आठवड्यांत मोठी कारवाई करणार आहोत. अमेरिकन सैन्य आपले ध्येय साध्य करण्याच्या अगदी जवळ आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या संबोधनामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत.
ट्रम्प म्हणाले की, होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे सुरक्षित केली जाईल. जे त्या मार्गाने तेल आयात करतात त्यांनी त्याचे संरक्षण करण्यासाठी पुढे यावे आणि अमेरिका त्यांना मदत करेल. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर, जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०५ डॉलरवर पोहचल्या आहेत. ट्रम्प यांच्या संबोधनामुळे आशियाई शेअर बाजारांसह हिंदुस्थानी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे.
जागतिक कच्च्या तेलाच्या किमती १०५ डॉलरवर गेल्या आहेत. एक दिवस आधी ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती १०० डॉलर प्रति बॅरलच्या खाली घसरल्या होत्या. मात्र, आज त्यात लक्षणीय वाढ दिसून आली. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड ५% नी वाढून १०६.२२ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. बेंचमार्क अमेरिकन क्रूड तेल ४.२% नी वाढून १०४.३६ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले.
हिंदुस्थानसह संपूर्ण जगासाठी कच्च्या तेलाचे करार महाग झाले आहेत. बुधवारपर्यंत कच्चे तेल कमी किमतीत उपलब्ध होते, पण आता ते १०५ डॉलर किंवा त्याहूनही अधिक किमतीत उपलब्ध होऊ शकते, कारण कच्च्या तेलाच्या किमती थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. किमती प्रत्येक तासाला वाढत आहेत.
ट्रम्प यांच्या भाषणानंतर आणि तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या तीव्र वाढीमुळे गुरुवारी आशियाई बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात टोकियोचा निक्केई २२५ १.४% घसरून ५३,००४.८१ वर आला. दक्षिण कोरियाचा कोस्पी ३.४% घसरून ५,२९२.३६ वर आला. हाँगकाँगचा हँग सेंग ०.८% घसरून २५,०८२.५९ वर आला. अमेरिकन फ्युचर्समध्ये ०.७% पेक्षा जास्त घसरण झाली. ट्रम्प यांच्या भाषणानंतर भारतीय शेअर बाजारातही तीव्र घसरण झाली आहे. तेलाच्या किमतींमध्ये सतत होणाऱ्या वाढीमुळे ही घसरण आणखी तीव्र होऊ शकते.
Comments are closed.