IPL: 10 नाही 12 संघांमध्ये होणार विजेतेपदाची लढत? बीसीसीआयचा मास्टर प्लान घ्या जाणून, 100 पेक्षा अधिक…

इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल जागतिक क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय लीगपैकी एक आहे. स्पर्धेचा प्रसार आणि प्रेक्षकसंख्या या बाबतीत केवळ आयसीसी विश्वचषकच त्याला मागे टाकू शकतो. ही लीग जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक पाहिली जाणारी स्पर्धा ठरली आहे. पहिल्या हंगामापासूनच या लीगचे आकर्षण वाढत गेले आहे, जे प्रत्येक हंगामावेळी वाढतच आहे. आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्याला विक्रमी प्रेक्षकसंख्या लाभली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल १९व्या हंगामाच्या पहिल्या सामन्याला जियोस्टारवर ४२६ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले. आता या लीगमध्ये संघांची संख्या वाढवण्याच्या विचारात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आहे. त्यामुळे पुढील हंगामांमध्ये १० ऐवजी १२ संघ खेळताना दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या लीगच्या विस्ताराची ही कल्पना काही नवीन नाही. यामध्ये प्रसारण हक्कामधून मिळणाऱ्या मोबदल्याचे अधिक महत्व आहे. जेव्हा बीसीसीआयने लीगच्या प्रसारणाचे हक्क ४८३९० कोटींना विकले तेव्हा सामन्यांची संख्या हळूहळू वाढवण्याची योजना होती. मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ आणि २०२४ मध्ये ७४ सामने, २०२५ आणि २०२६ मध्ये ८४ सामने आणि २०२७ पर्यंत ९४ सामने खेळवण्याचे ठरवले होते, मात्र २०२६ च्या हंगामात ७४ सामने खेळवण्यात येणार आहे. त्यामागचे कारण म्हणजे आयसीसीच्या स्पर्धा वेळापत्रकांमुळे आयपीएलचा कालावधी वाढवण्यासाठी विंडो उपलब्ध नाही.

आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ म्हणाले, “आयपीएलला ७४ वरून ९४ वर नेण्यासाठी आम्हाला खरोखरच मोठ्या कालावधीची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक आधीच ठरलेले आहे. तसेच मार्चच्या मधल्या काळापासून ते मे च्या अखेरपर्यंतच वेळ उपलब्ध आहे. जून महिना सुरू होताच पावसाचा व्यत्यत येतो, त्यामुळे तेव्हा सामने वाढवता येत नाही. जर सध्यस्थितीत आपण ७४ वरून ९४ सामने खेळवण्याचा प्रयत्न केला तर डबल-हेडर जास्त होतील. ते प्रसारकांसाठी सोयीचे नाही. त्यामुळे आम्ही ७४ सामन्यांपुरतेच मर्यादित ठेवले आहे.”

पुढील हंगामात संघ वाढवण्याबाबत धुमाळ म्हणाले, “हे उपलब्ध असणाऱ्या वेळेवर अवलंबून आहे. गुंतवणूकदार तयार आहेत, मात्र जोपर्यंत आपल्याला मोठा कालावधी मिळत नाही, तोपर्यंत हे शक्य होणार नाही. किती द्विपक्षीय सामने, किती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) स्पर्धा आणि या लीगसाठी कोणते कालावधी उपलब्ध आहेत, याचा व्यापक विचार करायला हवा. हा प्रश्न केवळ आयपीएलपुरता मर्यादित नाही.”

आयपीएलमध्ये वाढलेले संघ पाहिले तर २००८ ते २०२१ पर्यंत ८ संघ होते, त्यामध्ये २०११ ते २०१३ पर्यंत थोडा विस्तार झाला होता. २०२२ पासून लीगमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन नवीन संघांचा कायमस्वरूपी समावेश झाला.

Comments are closed.