KKR vs SRH: केकेआरचा 65 धावांनी धुव्वा उडवत हैदराबादने उघडलं विजयाचं खातं; रघुवंशीची अर्धशतकी खेळी व्यर्थ!
सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा 65 धावांनी पराभव करत आयपीएल 2026 मधील आपला पहिला विजय नोंदवला आहे (KKR vs SRH). कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात केकेआरने टॉस जिंकून आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 226 धावांचा डोंगर उभा केला. या विशाल लक्षाचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ पूर्ण 20 ओव्हर्सही टिकू शकला नाही आणि 161 धावांवर गारद झाला.
हैदराबादसाठी अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड (Abhishek Sharma and Travis Head) यांनी मैदानात अक्षरशः धुमाकूळ घातला. या दोघांनी अवघ्या 34 चेंडूत 82 धावांची सलामी भागीदारी केली. अभिषेकने 48 तर ट्रॅव्हिस हेडने 46 धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर हेनरिक क्लासेनने 52 धावांची खेळी करत हैदराबादला 226 धावांपर्यंत पोहोचवले.
आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सची (Kolkata knight riders) सुरुवात खराब झाली. टी-20 वर्ल्ड कपमध्ये 33 चेंडूत शतक ठोकणाऱ्या फिन ॲलनने (Phinn alyen) आक्रमक सुरुवात केली होती. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये 3 चौकार आणि 2 षटकार मारले, पण 7 चेंडूत 28 धावा करून तो बाद झाला. कर्णधार अजिंक्य रहाणेलाही (Ajinkya Rahane) केवळ 8 धावा करता आल्या.
युवा फलंदाज अंघकृष रघुवंशीने 29 चेंडूत 52 धावांची झुंजार खेळी केली. या खेळीसह तो आता ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. मात्र, दुसरीकडे 25.2 कोटींची किंमत असलेला कॅमरन ग्रीन सलग दुसऱ्या सामन्यात फ्लॉप ठरला, तो फक्त 2 धावांवर बाद झाला. रिंकू सिंगने 25 चेंडूत 35 धावा केल्या, पण तो संघाचा पराभव टाळू शकला नाही.
एकवेळ कोलकाता संघ मजबूत स्थितीत होता. 10.5 ओव्हर्समध्ये 3 बाद 120 धावा झाल्या होत्या आणि विजय सोपा वाटत होता. पण 11व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अंघकृष रघुवंशी रनआऊट झाला आणि तिथूनच सामन्याचे चित्र पालटले. त्यानंतर पुढच्या अवघ्या 41 धावांत कोलकात्याने आपल्या शेवटच्या 7 विकेट्स गमावल्या आणि संपूर्ण संघ 161 धावांवर बाद झाला.
Comments are closed.