Chandrapur news – मुख्यमंत्र्यांचे आदेश हवेतच, मिंथूरच्या हतबल शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे इच्छामरणाची मागणी

कर्जाचा डोंगर आणि अवैध सावकारांचा जाच माणसाला कोणत्या थराला नेऊ शकतो, याचे अंगावर शहारे आणणारे प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आले होते. नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी अवैध सावकारीच्या विळख्यातून सुटण्यासाठी कंबोडियामध्ये जाऊन आपली किडनी विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. मात्र, इतका टोकाचे पाऊल उचलूनही आजही हा शेतकरी न्यायासाठी सरकारी उंबरठे झिजवत असून अखेर हतबल होऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवैध सावकारांची संपत्ती गोठवण्याचे आदेश दिले होते. या निर्णयामुळे रोशन कुडे यांना न्यायाची आशा पल्लवीत झाली होती. मात्र, दीड महिना उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप कुडे यांनी केला आहे. सावकार आजही मोकाट असून प्रशासकीय यंत्रणा ढिम्म आहे, अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली.

शेती गेली, आता जगायचे कसे?

रोशन कुडे यांची संपूर्ण उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. मात्र, अवैध सावकारांनी त्यांच्या शेतीवर ताबा मिळवल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. गेल्या चार महिन्यांपासून ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि विविध विभागांत चकरा मारत आहेत, पण अद्याप त्यांना त्यांची शेती परत मिळालेली नाही.

“माझ्या प्रकरणाला चार महिने झाले, पण मला अजूनही न्याय मिळालेला नाही. माझी शेती मला परत मिळावी हीच एक मागणी आहे. शासन जर मला मदत करू शकत नसेल, तर मला माझ्या कुटुंबासह इच्छामरणाची परवानगी द्यावी.”

– रोशन कुडे, पीडित शेतकरी

प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह

एकीकडे सरकार शेतकरी हिताच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे स्वतःची किडनी विकण्याची वेळ आलेल्या शेतकऱ्याला चार महिने उलटूनही न्याय मिळत नाही यावरून प्रशासकीय संवेदनशीलता हरवली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता जिल्हाधिकारी या निवेदनावर काय कारवाई करतात आणि रोशन कुडे यांना त्यांची हक्काची शेती परत मिळते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

देवाभाऊ, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा… कर्जाच्या परताव्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली

Comments are closed.