Israel Iran War – मध्य पूर्वेत युद्धाचा भडका: इराणचा कुवेतच्या रिफायनरीवर ड्रोन हल्ला; तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती
आखाती देशांमधील तणाव आता एका अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला असून इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. अमेरिकेने इराणमधील सर्वात उंच पुलावर केलेल्या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या तेहरानने आखाती देशांमधील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून इराणने कुवेतच्या ‘मीना अल-अहमदी’ या अत्यंत महत्त्वाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर भीषण ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे रिफायनरीच्या अनेक युनिट्समध्ये मोठी आग लागली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे हा ड्रोन हल्ला झाला. रिफायनरीमधील कार्यरत युनिट्सना आग लागल्यानंतर स्थानिक अग्निशमन दल आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. प्रशासनाने तातडीने सुरक्षा नियमावली लागू केली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. मीना अल-अहमदी ही रिफायनरी कुवेतच्या सर्वात मोठ्या तेल प्रक्रिया केंद्रांपैकी एक असल्याने, या हल्ल्यामुळे जागतिक तेल पुरवठा साखळीवर आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील इंधनाच्या किमतींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणला दिलेल्या ताज्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याने जागतिक राजकारणात खळबळ माजली आहे.
दुसरीकडे, इराणच्या या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या हवाई हद्दीत घुसलेले इराणचे पाच ड्रोन यशस्वीपणे पाडले आहेत. इस्रायलमध्येही युद्धाचे ढग गडद झाले असून तेल अवीवमध्ये हल्ल्याच्या शक्यतेने सायरन वाजवले जात आहेत. इस्रायली लष्कराने आपली हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, अमेरिका आणि इस्रायलने त्यांच्या औद्योगिक तळांवर केलेल्या हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी त्यांनी संयुक्त अरब अमिरात, बहरीन आणि इस्रायलमधील ठिकाणांना लक्ष्य केले आहे. इराणने आखाती देशांतील एकूण आठ पुलांना लक्ष्य करण्याची धमकी दिल्याने या संपूर्ण प्रदेशात युद्धाचा धोका वाढला आहे.
Comments are closed.