'तो निर्णय चुकला…' अजिंक्य रहाणेच्या रणनीतीवर इरफान पठाणने साधला निशाणा

वरुण चक्रवर्तीला आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) ‘ट्रम्प कार्ड’ मानले जाते. वरुणने केकेआरसाठी केलेल्या आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावरच भारतीय संघात स्थान मिळवले होते आणि मोठे यश संपादन केले होते. मात्र, टी-२० विश्वचषक २०२६ पासून सुरू झालेला त्याचा खराब फॉर्म आयपीएलमध्येही पाहायला मिळत आहे. गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध झालेल्या सामन्यातही वरुण बराच महागडा ठरला. दरम्यान, या सामन्यात कर्णधार रहाणेने वरुणचा वापर पॉवरप्लेमध्ये करणे माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणला पटले नाही आणि त्याने या निर्णयावर टीका केली आहे.

​इरफान पठाणने ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना सांगितले की, “अजिंक्य रहाणेने ‘आउट-ऑफ-फॉर्म’ असलेल्या वरुणकडून पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करून घ्यायला नको होती. हा चुकीचा निर्णय होता. एक गोलंदाज म्हणून तुमचा आत्मविश्वास वाढवण्यात कर्णधाराची मोठी भूमिका असते. जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही अधिक चांगले करू शकता आणि तुमच्याकडे लय (मोमेंटम) आहे, अशा वेळी जर कर्णधार तुम्हाला साथ देत नसेल, तर तिथेच नेतृत्वाची गरज असते. म्हणूनच त्याने पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करायला नको होती.”

​तो पुढे म्हणाला, “तुम्ही अशा गोलंदाजाला गमावत आहात जो तुमचा ट्रम्प कार्ड ठरू शकतो, जो तुमचा मॅच-विनर ठरू शकतो आणि जो तुमचा मॅच-विनर राहिला आहे. एक कर्णधार म्हणून तुम्ही त्याला कठीण काम देत आहात.” मात्र, दुसऱ्या सत्रात कर्णधार म्हणून रहाणेने केलेल्या कामगिरीचे पठाणने कौतुकही केले. वरुणने एसआरएच विरुद्ध २ षटकांच्या गोलंदाजीमध्ये ३१ धावा लुटवल्या.

​सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या एसआरएचने हेनरिक क्लासेनच्या ५२, अभिषेक शर्माच्या ४८, ट्रॅव्हिस हेडच्या ४६ आणि नितीश कुमार रेड्डीच्या ३९ धावांच्या जोरावर ८ बाद २२६ धावा केल्या होत्या. २२७ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा संघ १६ षटकांत १६१ धावांवर गारद झाला आणि ६५ धावांनी सामना हरला. केकेआरचा हा सलग दुसरा पराभव होता, तर एसआरएचने आपल्या दुसऱ्या सामन्यात पहिला विजय नोंदवला.

Comments are closed.