Ratnagiri News – लोटेतील पुष्कर कंपनीच्या आवारात भंगार गोळा करताना महिलेचा मृत्यू, कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
लोटे औद्योगिक क्षेत्रातील पुष्कर कंपनीच्या आवारात टाकलेले भंगार गोळा करताना एका महिलेची गरम मातीने साडी व हात भाजल्याची घटना काही दिवसांपूवी घडली होती. उपचारादरम्यान तिचा कोल्हापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेस कारणीभूत ठरलेल्या कंपनीच्या एच.आर.मॅनेजर, सेफ्टी मॅनेजर, मालक व व्यवस्थापक अशा चौघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकुंतला बबन सोनवणे (४८) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ललिता चंद्रकांत सोनावणे (सध्या रा. चिपळूण., मूळ रा.पाचगणी, ता. शिराळा, जि. सांगली ) यांची चुलत सासू शकुंतला बबन सोनावणे (४८) पुष्कर कंपनीच्या आवारात टाकलेले भंगार गोळा करताना भाजल्याने त्यांना पुढील उपचारार्थ कोल्हापूर येथील सी. आर. आर. हाॅस्पीटल, कोल्हापूर येथे दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. कंपनी आवारातील गरम मातीने दुर्घटना होऊ शकते, हे माहीत व जाणीव असतानाही निष्काळजीपणा दाखवून या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पुष्कर कंपनीचा सेफ्टी मॅनेजर सुधाकर जगताप, एच आर मॅनेजर सचिव बाळकृष्ण मनवळ (४३, रा. भरणे बाईतवाडी, खेड, जि. रत्नागिरी), रविंद्रकुमार सवरमल भुतिया (५३, रा. बांदल हायस्कूल, चिपळूण, जि. रत्नागिरी ), व मालक गौतम मखरिया यांच्यासह व्यवस्थापकांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Comments are closed.