पुण्यात झालेल्या पावसाने प्रशासनाचे अपयश दिसून आले, आदित्य ठाकरे यांची टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बुधवारी अवघ्या दोन तासांच्या मुसळधार अवकाळी पावसाने पुणे शहर पाण्यात गेले. सिंहगड रस्त्यावर नवश्या मारुती मंदिराच्या शेजारी फुले विक्रसाठी बसलेल्या महिलेच्या अंगावर झोड कोसळल्याने मृत्यू झाला. शहरात 82 ठिकाणी झाडे पडली. रस्ते तुंबले, वाहतूक ठप्प झाली, वीज गायब झाली. मध्यवर्ती भागासह उपनगरातील अनेक रस्ते जलमय झाले होते. या अवकाळी पावसामुळे पुण्याच्या झालेल्या परिस्थितीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे. ”पुण्यात झालेल्या पावसाने प्रशासनाचे अपयश दिसून आले”, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

”पुण्यातील कालचा पाऊस हा ‘ढगफुटी’ किंवा ४ तासांत झालेला अतिवृष्टी या श्रेणीतला नव्हता त्यामुळे जे प्रकर्षाने दिसून आले ते म्हणजे प्रशासनाचे अपयश. कालच्या पावसामुळे पुणे जलमय झाले होते. त्यामुळे जनतेला जो त्रास सहन करावा लागला, तो केवळ एका रात्रीच्या घटनेचा परिणाम नव्हता, तर पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या स्पष्ट संकेतांकडे सरकार आणि सत्ताधाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण दुर्लक्षाचा तो परिणाम आहे. गेल्या ४ वर्षांपासून पर्यावरणवादी, नगररचनाकार, अभियंते, नागरी समाज आणि राजकीय नेत्यांनी चुकीच्या प्रकल्पांच्या विरोधात आवाज उठवला आहे आणि खालील अवाजवी प्रकल्पांना पर्यायही सुचवले आहेत. Riverfront Development, मेट्रो पिलर्सची चुकीची जागा, नदीपात्रातील अतिक्रमणे, नदीच्या निळ्या व लाल पूररेषांमध्ये केलेले बदल, वेताळ टेकडीचा प्रस्तावित विनाश अशा गोष्टींचा पुण्याच्या पर्यावरणावर मोठा परिणाम झाला आहे. केवळ विचारशून्य पद्धतीने काँक्रीटचे जंगल तयार करणे म्हणजे ‘विकास’ नव्हे. गेल्या संपूर्ण दशकापासून पुण्यात जे ‘ट्रिपल इंजिन’ सरकार आहे, त्यांनी केवळ आपत्तीच ओढवून आणली आहे. जर असाच तथाकथित विकास सुरू राहिला, तर पुण्याला अशा परिस्थितीचा वारंवार सामना करावा लागेल; दुर्दैवाने, हे ट्रिपल इंजिन सरकार केवळ विकासाचे मृगजळ दाखवत आहे.”, असे आदित्य ठाकरे म्हणाले

२०२१ मध्ये पर्यावरण मंत्री असताना, मी रिव्हरफ्रंट प्रकल्पाला स्थगिती दिली होती आणि पुण्याच्या गरजांनुसार त्यात सुधारणा करण्यास सांगितले होते. लाल आणि निळ्या पूररेषा पुन्हा नैसर्गिक आणि मूळ रेषांनुसार निश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही सलीम अली पक्षी उद्यानाचे पुनरुज्जीवन केले होते, जिथे आता पुन्हा राडारोडा (debris) भरला गेला आहे. वेताळ टेकडी आणि इतर मोकळ्या जागा वाचवणे गरजेचे आहे. निवड आता आपल्या हातात आहे आणि त्याचा परिणाम काल सर्वांनी अनुभवलाच आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Comments are closed.