Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले

जळगाव : राज्यात शिवसेना पक्षातील फुटीनंतर 40 हून अधिक आमदारांनी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेसोबत जाणे पसंत केले. तेव्हापासून मंत्री गुलाबराव पाटील हेही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखले जातात. तर, इकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सातत्याने एकनाथ शिंदेंच्या आमदारांवर, मंत्र्‍यांवर तोफ डागली. त्यात, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. गुलाबराव पाटील यांनीही संजय राऊत (Sanjay Raut) यांना भोंगा म्हणत अनेकदा डिवचले. मात्र, आज एका लग्न सोहळ्यानिमित्ताने गुलाबराव पाटील (gulabrao patil) आणि संजय राऊत आमने-सामने आले होते. त्यावेळी, आधी दोघांनीही एकमेकांना दुरुनच पाहून हाय-हॅलो केले, त्यानंतर दोघांचे मनमोकळे हास्यही दिसले.

सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोन राजकीय कट्टर विरोधक असलेले संजय राऊत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांचा एकमेकाला झालेला नमस्कार जळगाव जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे. जळगावच्या धरणगाव येथे शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत आणि मंत्री गुलाबराव पाटील हे दोघं एकत्र आल्याचे पाहावयास मिळाले. संजय राऊत यांनी विवाह सोहळ्यात प्रवेश केल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांना हात दाखवत नमस्कार केला, त्यावर गुलाबराव पाटील यांनी देखील हसून त्यांच्या नमस्कार याचा स्वीकार केला.  विशेष म्हणजे, दोघेजण एकाच रांगेत बसलेले होते, मात्र त्यानंतर दोघांनीही एकमेकांकडे बघण्याचे टाळले. त्यामुळे, येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी दोन्ही नेत्यांची ही दूरुनची भेट, मनमोकळा हास्य संवाद चर्चेचा ठरला.

आधी दुरुनच हसले, नंतर जवळ भेटले

दरम्यान, वधू-वरास शुभेच्छा देऊन संजय राऊत परत येत असताना मंत्री गुलाबराव पाटील वधु-वरास शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर जात होते. त्यावेळी, दोघांनी एकमेकांच्या हातात हात घेतला. तर, संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्या पाठीवर हात थाप दिली. संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांनी एकमेकांना दिलेल्या दुरुनच्या आपुलकीतला अबोल संवाद चांगलाच लक्षवेधी ठरला.

ठाकरे-गोगावले भेटीची आठवण

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाच्या रिसेप्शन सोहळ्यात शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्री भरत गोगावले हेही असेच समोरासमोर आले होते. त्यावेळी, भरत गोगावले यांनीही उद्धव ठाकरेंना, साहेब पुढे या असं म्हटल्याची जोरदार चर्चा रंगली होती, तसेच हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.

हेही वाचा

अंजली दमानियांना अटक करा, त्यांना कॉल डिटेल्स कोणी दिले याची चौकशी करा, प्रकाश महाजनांची मागणी

आणखी वाचा

Comments are closed.