लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीचे पीफास उत्पादन बंद करा, मागणीसाठी सहा एप्रिलला लोटे एमआयडीसीत मोर्चा
कोकण नागरी संघर्ष समिती आणि लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती तसेच परिसरातील सर्व स्थानिक नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने लोटे एमआयडीसी परिसरातील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत होणाऱ्या पीफास (PFAS) उत्पादनाच्या विरोधात दि.६ एप्रिल रोजी कंपनी समोर मोर्चा काढण्यात येणार आहे.
ऑरगॅनिक कंपनीत होणाऱ्या पीफाससारख्या घातक रसायनांच्या उत्पादनामुळे पर्यावरण, पाणी, माती आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून पर्यावरण व आरोग्य रक्षणासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
मोर्चाद्वारे पीफाससारख्या घातक रसायनांचे उत्पादन तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच परिसरातील प्रदूषणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, दूषित पाणी, माती व आरोग्यावर झालेल्या परिणामांबाबत स्वतंत्र वैज्ञानिक अहवाल जाहीर करावा आणि स्थानिक ग्रामस्थांचे स्वच्छ पाणी व आरोग्य सुरक्षित ठेवावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय तात्काळ जनसुनावणी आयोजित करून स्थानिकांचे मत विचारात घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
“आपण येणार – मोर्चा यशस्वी करणार!” या घोषणेसह आयोजकांनी सर्व ग्रामस्थ, तरुण, महिला, शेतकरी, मासेमारी बांधव, कामगारांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपल्या जमिनी, पाणी, हवा आणि पुढील पिढ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी हा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Comments are closed.