हेनरिक क्लासेन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा परतणार? पाहा काय म्हणाला क्लासेन
दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास नकार दिला असून, कुटुंबाला वेळ देण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. ३४ वर्षांच्या क्लासेनने गेल्या वर्षी जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा केंद्रीय करार (Central Contract) न मिळाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती घेतली होती. सध्या तो फक्त टी२० लीग खेळतो. आयपीएलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये क्लासेनने सनरायझर्स हैदराबादमधील आपला सहकारी नितीश कुमार रेड्डीशी संवाद साधला.
क्लासेन म्हणाला, “मी दोन आठवडे याबद्दल विचार केला, पण शेवटी पुनरागमन न करण्याचा निर्णय घेतला.” तो पुढे म्हणाला की, “माझ्या या निर्णयात कुटुंबाची मोठी भूमिका आहे. माझे मित्र जेव्हा टी२० विश्वचषकात चांगली कामगिरी करत होते, तेव्हा मला सारखे वाटायचे की मी त्यांच्यासोबत का नाही? मला पुन्हा संघात परतायचे होते आणि त्याबाबत मी एडन मार्करमशी चर्चाही केली होती.”
तो पुढे म्हणाला की, “मार्करमने सांगितले होते की जर मला संघात स्थान दिले गेले तर मी नक्कीच परत येईन. पण विश्वचषकानंतर मला जाणवले की असे होणार नाही, म्हणून मी आता पुनरागमन करत नाहीये.” क्लासेनने २०२४ मध्येच कसोटी क्रिकेटला निरोप दिला होता.
Comments are closed.