रशिया भारताचा तेल पुरवठा वाढवणार आहे.

उपाध्यक्ष डेनिस मान्टूरोव्ह यांच्याकडून आश्वासन : खतांचा पुरवठाही अधिक प्रमाणात करण्यास प्रारंभ

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सध्याच्या जागतिक इंधन संकटात भारताला कच्चे इंधन तेल आणि इंधन वायू यांचा अधिक पुरवठा करण्याचे आश्वासन रशियाने दिले आहे. रशियाचे उपाध्यक्ष डेनिस मान्टूरोव्ह सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा प्रथमच भारत दौरा आहे. भारताचा तेल आणि वायूपुरवठा टप्प्याटप्प्याने वाढविण्याची क्षमता रशियाच्या तेल कंपन्यांमध्ये आहे, असे प्रतिपादन मान्टूरोव्ह यांनी शुक्रवारी भारतात केले.

केवळ तेल आणि वायूच नव्हे, तर रशियाने भारताला खतांचा पुरवठाही अधिक प्रमाणात करण्यास प्रारंभ केला आहे. 2025 च्या अखेरपर्यंत या पुरवठ्यात 40 टक्के वाढ करण्यात आली आहे. भारताच्या आवश्यकतांची पूर्ती करण्यासाठी रशिया नेहमीच सज्ज आहे. कारण, भारताशी मैत्री आणि भागीदारी आमच्यासाठीही महत्त्वाची आहे, असेही वक्तव्य मान्टूरोव्ह यांच्याकडून केले गेले.

अणुऊर्जा क्षेत्रातही सहकार्य

भारत आणि रशिया यांच्यात अणुऊर्जा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात सहकार्य होत आहे. यासंबंधी दोन्ही देशांमध्ये करार झालेले आहेत. या करारांमध्ये जो कार्यक्रम निर्धारित करण्यात आलेला आहे, त्यानुसार रशिया भारताला साहाय्य आणि पुरवठा करणार आहे. तामिळनाडू येथील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पात नव्या वीजनिर्मिती भट्ट्या बांधण्याचा कार्यक्रम सध्या हाती घेण्यात आला आहे. तो वेळेवर पूर्ण होईल. अशा प्रकारे दोन्ही देश त्यांचे सहकार्य पुढे नेत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

संयुक्तरित्या खतनिर्मिती करणार

भारत आणि रशिया यांनी भारतात संयुक्तरित्या युरिया आणि अन्य खतांच्या निर्मितीचे प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांवर वेगाने काम होत आहे. दोन्ही देशांमध्ये प्रदीर्घ काळासाठी कृषी क्षेत्रात सहकार्य केले जाणार आहे. भारतात अन्नधान्यांच्या उत्पादन वाढीसाठी खतांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे. रशिया ती भागविण्यासाठी साहाय्य करू शकतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.

तांत्रिक संशोधनातही भागीदारी

ऊर्जा आणि कृषी क्षेत्रांप्रमाणेच उद्योग, अवकाश, तंत्रवैज्ञानिक संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करीत आहेत. भारत आणि रशिया यांनी प्रशासनांतर्गत आयोगाची स्थापना केली असून मान्टूरोव्ह हे या आयोगाचे सहअध्यक्ष आहेत. या आयोगाच्या माध्यमातून सहकार्याच्या नव्या  क्षेत्राचा शोध दोन्ही देश घेत आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.

प्रगतीचा आढावा

भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेच्या अंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावाही मान्टूरोव्ह यांच्या या दौऱ्यात घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी दोन्ही देशांची 23 वी वार्षिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेत भविष्यकाळातील सहकार्य आणि भागीदारीची रुपरेषा सज्ज करण्यात आली होती. त्या परिषदेत ठरविण्यात आल्यानुसार किती कामे पूर्ण झाली आणि किती होत आहेत, यांचाही आढावा भारतीय नेत्यांशी बोलून मान्टूरोव्ह यांनी घेतला आहे. भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय व्यापारही मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला असून त्याची रुपरेषा निर्धारित करण्यात येत आहे.

भारताची रशियाकडून तेल खरेदी

2021-2022  आवश्यकतेच्या 2 टक्के (साधारण 5 कोटी बॅरल)

2022-2023  आवश्यकतेच्या 21.6 टक्के (साधारण 50 कोटी बॅरल)

2023-2024  आवश्यकतेच्या 35.9 टक्के (साधारण 80 कोटी बॅरल)

2024-2025  आवश्यकतेच्या 35.8 टक्के (साधारण 78 कोटी बॅरल)

2025-2026  आवश्यकतेच्या 20 टक्के (साधारण 45 कोटी बॅरल)

Comments are closed.