भारत आणि पाकिस्तान यांच्यात ट्रॅक-2 चर्चा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मागील वर्षाच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान अद्याप तणाव आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलिकडेच पाकिस्तानला कुठल्याही दुस्साहसापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. याच्या प्रत्युत्तरादाखल पाक संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पहलगामचा उल्लेख करत प्रतिहल्ल्याची धमकी दिली. या सर्व घडामोडींच्या दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात ‘ट्रॅक-2’ चर्चा जारी आहे.

फेब्रुवारी महिन्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यान कतारची राजधानी दोहा येथे ट्रॅक-2 चर्चा झाली. दोहा येथील चर्चा दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर झाली होती. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद विरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.

ट्रॅक-2 चर्चेतून फारसे यश मिळत नसले तरीही याला एक अनौपचारिक संवादाचे माध्यम मानले जाते. याचबरोबर अशाप्रकारच्या चर्चेनंतर कुठलेही वक्तव्य किंवा पत्रक जारी केले जात नाही. या चर्चेची कुणी पुष्टी करत नाही तसेच त्याला फेटाळतही नाही.

ट्रॅक-2 चर्चा भारतासाठी नवी नाही. ट्रॅक-2 चर्चा ही संकल्पना जगासमोर सर्वप्रथम 1981 साली अमेरिकेचे मुत्सद्दी जोसेफ मोंटविले यांनी मांडली होती. या चर्चेत माजी अधिकारी, पत्रकार, उद्योजक आणि नागरी समुदायाचे प्रतिनिधी सामील असतात. या चर्चेचा उद्देश परस्पर विश्वास वाढविणे आणि विचारांचे प रीक्षण करणे तसेच राजकारण अन् माध्यमांपासून दूर परस्पर समजासाठी वातावरण निर्माण करणे आहे.

चीनसोबतही ट्रॅक-2 चर्चा

ट्रॅक-1 चर्चा सरकारशी सरकारसोबत औपचारिक स्वरुपात असते. तर ट्रॅक-2 मध्ये ती फेटाळण्याची संधी असते. गलवान हिंसेनंतर 2020 मध्ये देखील भारत आणि चीनदरम्यान ट्रॅक-2 चर्चा जारी राहिली, ज्यामुळे दोन्ही देशांदरम्यान तणाव कमी करण्यास मदत मिळाली. त्यानंतर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद मोदींनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली होती. मग ऑक्टोबर 2025 मध्ये 5 वर्षांनी दोन्ही देशांदरम्यान थेट विमानसेवा सुरू झाली होती. जिनपिंग चालू वर्षात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत भाग घेण्यासाठी भारत दौऱ्यावर येऊ शकतात.

द्विपक्षीय संबंध सुधारणा का?

सद्यस्थितीत पाकिस्तानसोबत भारताचे संबंध सुधारण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. असीम मुनीर हे पाकिस्तानचे फील्ड मार्शल झाल्यापासून तेथे लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटना पुन्हा मजबूत होऊ लागल्या आहेत. या दहशतवादी संघटना उघडपणे भारताला धमकी देत आहेत. जैश-ए-मोहम्मदसारखी दहशतवादी संघटना स्वत:चे प्रशिक्षण तळ वाढवत आहेत. याचबरोबर पाकिस्तान चीनसोबत मिळून स्वत:च सैन्यतयारी मजबूत करत आहे.

-कतारची राजधानी दोहा येथे ट्रॅक-2 चर्चा पडली पार

-तणावपूर्ण संबंधांदरम्यान त्रयस्थ देशात चर्चेचा प्रयत्न

-ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांदरम्यान थेट चर्चा नाही

Comments are closed.