माझ्यावर टीका करा, पण..; चेन्नईच्या पराभवावर आर. अश्विन संतापला! जाणून घ्या नेमकं काय म्हणाला?

पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Punjab kings vs Chennai super kings) यांच्यातील सामन्यात चेन्नईच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. या स्पर्धेत चेन्नईला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना धावफलकावर 209 धावांचे मोठे आव्हान उभे केले होते, जे पंजाब किंग्सने अत्यंत सहजपणे पूर्ण केले. इतका मोठा धावसंख्या उभारूनही पराभव झाल्याने हे स्पष्ट झाले आहे की, या हंगामात सामने जिंकायचे असतील तर संघांना 250 च्या आसपास धावा कराव्या लागतील. कारण 200 हून अधिक धावांचा पाठलाग होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2026 च्या आयपीएल हंगामात अनेकदा अशा मोठ्या धावसंख्यांचा यशस्वी पाठलाग झाला आहे.

चेपॉक मैदानावर पंजाबकडून मिळालेल्या या पराभवानंतर, भारताचा स्टार गोलंदाज आणि चेन्नईचा माजी खेळाडू रविचंद्रन अश्विनने (R. Ashwin) मॅनेजमेंटवर जोरदार टीका केली आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विन म्हणाला की, आपल्या जुन्या संघाला अशा प्रकारे संघर्ष करताना पाहणे खूप क्लेशदायक आहे. सत्य बोलल्यामुळे माझ्यावर टीका झाली तरी चालेल, पण संघाचा पराभव घसरलेला दर्जा मी दुर्लक्ष करू शकत नाही, असे त्याने स्पष्ट केले.

अश्विन पुढे म्हणाला, लोक काय म्हणतात त्याने मला फरक पडत नाही. कुणी मला जज करो किंवा काहीही म्हणो, माझी विचारसरणी बदलणार नाही. चेन्नई माझ्यासाठी नेहमीच अभिमानाची गोष्ट राहिली आहे. पण आज जेव्हा मी संघाला खेळताना पाहिले, तेव्हा 15 व्या ओव्हरपर्यंत खेळाडूंचे खांदे पडलेले (थकलेले/निराश) दिसले. हे दृश्य खरोखरच खूप वेदनादायी होते. जेव्हा संघात अनुभवाची कमतरता असते, तेव्हा त्यांच्या देहबोलीतून ते स्पष्टपणे जाणवते. मैदानावरचे वातावरण सर्व काही सांगून जात होते.

आयपीएलमधील चेन्नईची कामगिरी खालावत चालल्याने अश्विनने चिंता व्यक्त केली. तो म्हणाला, जेव्हा मी क्रिकेट पाहतो, विशेषतः ज्या संघासाठी मी खेळलो आहे, तेव्हा माझ्यासाठी तमिळनाडू पेक्षा मोठे काहीच नाही. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत हीच आहे की, मी तमिळनाडूसाठी रणजी ट्रॉफी जिंकू शकलो नाही. भारतासाठी काही मिळवू शकलो नाही याचे मला इतके वाईट वाटत नाही, पण तमिळनाडूसाठी हे करू शकलो नाही याची बोच आजही मनात आहे. सध्या चेन्नई सुपर किंग्स सलग दोन पराभवांमुळे पॉईंट्स टेबलमध्ये तळाला पोहोचली असून, संघाची गोलंदाजी आणि रणनीती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Comments are closed.