रोहित शर्माचा मास्टरमाईंड! दिल्ली कॅपिटल्सला असं फसवलं की डीआरएसच झाला बाद

आयपीएल 2026 च्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सला 6 गडी राखून एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 162 धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने 18.1 षटकांत हे लक्ष्य सहज गाठले. या सामन्यात सर्वांना रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो केवळ 35 धावाच करू शकला. मात्र, रोहित शर्मा फलंदाजी करत असताना त्याच्या एका चालाकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, ज्याच्या नादात दिल्ली कॅपिटल्सचा एक ‘डीआरएस’ (DRS) वाया गेला. मुंबईच्या डावानंतर खुद्द रोहितने यामागचा खुलासा केला.

​मुंबई इंडियन्सचा डाव संपल्यानंतर ब्रॉडकास्टरशी बोलताना रोहित शर्माने त्याच्याविरुद्ध घेतलेल्या डीआरएसबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. रोहित म्हणाला, “मी कुलदीपला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो, त्याला डीआरएस घ्यायला आवडतं. म्हणूनच, मी तिथे फक्त नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत होतो. जरी मी पुढच्याच षटकात बाद झालो असलो तरी, मला माहित आहे की कुलदीपला जिथे 50-50 संधी वाटते, तिथे तो लगेच डीआरएस घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच मी फक्त माझी चाल खेळली आणि निर्णय आमच्या बाजूने लागला.”

​हार्दिक पांड्याशिवाय या सामन्यात मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सला दिल्लीविरुद्धच्या 6 गडी राखून मिळालेल्या पराभवामुळे गुणतालिकेत नुकसान सोसावे लागले आहे. या हंगामात विजयाने सुरुवात करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा हा दुसरा सामना होता आणि आता 2 सामन्यांत दोन गुणांसह ते सहाव्या क्रमांकावर घसरले आहेत, त्यांचा नेट रनरेट -0.206 इतका आहे. अशा स्थितीत मुंबई इंडियन्ससाठी पुढचे सामने खूप महत्त्वाचे झाले असून, त्यांचा पुढचा सामना (7 एप्रिल) रोजी गुवाहाटीच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे, या विजयानंतर 4 गुणांसह दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Comments are closed.