DC vs MI: समीर रिझवीची दिल्ली कॅपिटल्ससाठी वादळी खेळी! 'हा' पराक्रम करणारा ठरला तिसरा फलंदाज
आयपीएल (IPL) 2026 च्या आठव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज समीर रिझवीने (Sameer Rizvi) शानदार फलंदाजी करत 90 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर दिल्लीने 163 धावांचे लक्ष्य अत्यंत सहजपणे गाठले. या सामन्यात समीर रिझवीकडे शतक झळकावण्याची संधी होती, मात्र त्याचे शतक अवघ्या 10 धावांनी हुकले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्ससाठी तिसरी सर्वात मोठी खेळी करणारा तो फलंदाज ठरला आहे.
आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्ससाठी मुंबईविरुद्धच्या सामन्यात सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. त्याने 2013 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद 95 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जेसन रॉयचे नाव आहे. रॉयने 2018 मध्ये 91 धावांची खेळी केली होती. आता या यादीत समीर रिझवीचे नाव सामील झाले आहे. रिझवीकडे शतक झळकावून या दोघांना मागे टाकण्याची संधी होती, पण त्याला ते जमले नाही.
समीर रिझवीने या खेळीदरम्यान एक मोठी कामगिरी केली. तो आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून तिसरी सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज बनला आहे. आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम साई सुदर्शनच्या नावावर आहे. त्याने 2025 मध्ये दिल्लीविरुद्ध नाबाद 108 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावर जोस बटलरचे नाव आहे, ज्याने 2024 मध्ये केकेआरविरुद्ध नाबाद 107 धावा केल्या होत्या. आता रिझवी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने या सामन्यात 56 चेंडूत 90 धावा केल्या.
समीर रिझवीला या शानदार खेळीसाठी ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला.
हा पुरस्कार मिळाल्यानंतर रिझवी म्हणाला की, हो सर, मी स्वतःवर खूप मेहनत घेतली आहे, कारण गेल्या वर्षापासून आतापर्यंत माझ्यात खूप बदल झाले आहेत. मी माझ्या सर्व उणिवांवर काम केले. मला वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळताना थोडी अडचण येत होती, म्हणून मी संपूर्ण वर्ष त्यावर खूप काम केले. आता माझ्या मेहनतीला यश येत आहे आणि मी चांगली फलंदाजी करत आहे. आणि तुम्ही जे म्हणालात ते खरे आहे. जेव्हा एखादा खेळाडू आपल्या लयीत असतो, तेव्हा त्याला चेंडू वेगळाच (मोठा) दिसतो. हो सर, मी नेहमी परिस्थितीनुसार खेळण्याचा प्रयत्न करतो.
Comments are closed.