जागर – उपचार नको, औषध आवर

>> डॉ. चंद्रकांत लहरीया

भारतातच नव्हे तर जगभरात काही दशकांपासून लठ्ठपणा हा भूषणावह नसून त्रासदायकघातक असल्याचे लक्षात येऊ लागले आहे. अशा वातावरणाचा फायदा घेण्यासाठी औषधांचा सुकाळ निर्माण झाला. गेल्या वर्षी वजन कमी करण्यासाठी एक नवीन औषध बाजारात आले आणि त्याची जोरदार पी झाली, पण त्याच्या दुष्परिणामांचा विचारच केला गेला नाही. आरोग्याचे हे बाजारीकरण रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सध्याचे मानवी जीवन अतिशय धकाधकीचे आणि धावपळीचे झाले आहे. आहार, जीवनशैली, राहणीमान, विचारसरणी यात आमूलाग्र बदल झाल्याने त्याचे परिणाम आरोग्यावर होत आहेत. चांगले आरोग्य राहण्यासाठी नैसर्गिक उपचार अस्तित्वात असताना फास्टफूडप्रमाणे औषधांचा वापर करून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लठ्ठपणासारख्या आजारासाठी व्यायामाऐवजी औषधांचा आधार घेतला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमधून सेमाग्लूटाईड या औषधाची चर्चा सुरू आहे. भारतात प्रामुख्याने मधुमेहग्रस्तांसाठी वापरले जाणारे हे औषध वजन कमी करण्यातही मोलाचा हातभार लावते. मात्र भारतीय ग्राहक बाजाराचे आकलन करता ते आता वजन कमी करणारे औषध म्हणून सादर केले जात आहे.

भारतात सध्या लठ्ठपणा आणि त्यापासून होणारे आजार मधुमेह, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर व डिस्लिपिडेमिया बळावत आहेत. दर चौथा व्यक्ती हा लठ्ठपणाला बळी पडलेला दिसून येतो. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांत वाढणारा लठ्ठपणा आणि वजनात होणारी वाढ अर्थात यामागची कारणे सर्वांनाच ठाऊक आहेत. अल्ट्रा प्रोसेस्ड खाद्यपदार्थाचे वाढते सेवन, शहरातील जीवनशैली आणि कमी होणारी शारीरिक सािढयता, वातावरण मोकळे नसणे, तणावग्रस्त जीवन, मद्यपान, पुरेशी झोप नसणे या सर्व गोष्टी अशा आजारांना निमंत्रण देत आहेत.

या औषधांच्या प्रसारात चिंताजनक चित्र निर्माण झाल्याचे दिसून येते. ते समजून घेतले असता या औषधांचा प्रसार कसा झाला, हे लक्षात येईल. डॉक्टरांकडून प्रिपिपशनपवर देण्यात येणाऱया औषधांची जाहीरात करण्यास मनाई आहे. मात्र ‘सरोगेट जाहिरात’च्या नावाखाली कंपन्या या मर्यादा ओलांडण्याचे काम करताना दिसतात. लठ्ठपणा केंद्रस्थानी ठेवत औषधी कंपन्या मोठय़ा प्रमाणावर जाहिराती करतात. शहरात मोठमोठे होर्डिंग्ज लावतात. सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्सकडून अप्रत्यक्षपणे जाहिरातबाजी करून घेतात. जाहिरातपुरस्कृत लेखांच्या माध्यमातून वाचकांवर प्रभाव पाडला जातो. कालांतराने वाचक, गरजू नागरिकही अशा प्रकारच्या प्रचाराला बळी पडतात आणि उपचारांच्या पद्धतीवरही त्याचा नकळतपणे परिणाम होतो.

लठ्ठपणासारख्या गुंतागुंतीच्या समस्या या औषधांमुळे सहज सुटतील, असे वाटू लागल्याने त्यांची मागणी वाढत आहे. आता सेमाग्लुटाईड आणि अन्य जीएलपी -1 आधारित औषधे केवळ चरबीच नाही तर स्नायूंनादेखील कमकुवत करू शकतात. त्यास सारकोपनिया असे म्हटले जाते. पण वजन कमी करण्याच्या नादात या जोखमीकडे कानाडोळा केला जातो. परिणामी व्यक्तीचे वजन तर कमी होते, परंतु त्याची शक्ती अणि शरीरावर दीर्घकालीन परिणामदेखील होतात. दुष्परिणाम असतानाही औषध कंपन्या त्यावरच थांबल्या नाहीत तर सायकोपेनियाच्या उपचारासाठी एका नवीन औषधाचा शोध लावला जात आहे. प्रत्यक्षात लठ्ठपणाचा उपचार हा औषधांत नसून जीवनशैलीत आहे. यासंदर्भात आरोग्य संघटनादेखील अप्रत्यक्षपणे ठोस भूमिका घेत नसल्याचे दिसून येते. आजकाल क्लिनिकल दिशानिर्देश वेगाने बदलत आहेत आणि नवीन औषधांना लगेचच सामील केले जात आहे. त्यामुळे त्यांचा व्यापक प्रमाणात उपयोग होतो आणि व्यावसायिक यश हमखास मिळते. अशावेळी नियामक संस्थांकडून होणाऱया शिफारशी या ठोस पुराव्याच्या आधारावरच होतात का? असा प्रश्न आहे.

सध्या आपण विरोधाभासात्मक वातावरणात राहत आहोत. एक उद्योग जीवनशैलीला प्रोत्साहन देत आजारपणाला खतपाणी घालत आहे तर दुसरा उद्योग त्या आजारावरील उपायांसाठी औषधांची पी करत आहे. शिवाय या दुष्परिणामापासून वाचण्यासाठी औषधांची निर्मितीही होत आहे.  बाजाराच्या दृष्टीने या गोष्टी फायदेशीर आहेत, पण सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक. एकंदरीत आपण कोणत्या दिशेने जात आहोत आणि आपण निरोगी समाज घडवत आहोत का? की औषधांवर जगणारा समाज तयार करत आहोत? असा प्रश्न आहे. निरोगी आरोग्याच्या संकल्पनेला पुन्हा एकदा उजाळा देण्याची गरज आहे.

औषधे महत्त्वाची आहेत, पण ते प्रत्येकवेळी वापरणे चुकीचे ठरू शकते. संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाली, व्यायाम, पुरेशी झोप, तणावाचे व्यवस्थापन या गोष्टीला प्राधान्य द्यायला हवे. औषधांचा लाभ मिळण्याबरोबरच त्याच्या जोखमीची माहिती असणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे आणि यासाठी कंपन्यांनी पारदर्शकता बाळगली पाहिजे. आरोग्याचे बाजारीकरण रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. निरोगी आरोग्य मिळवण्यासाठी आपण औषधांच्या आहारी गेलो तर औषधांचे आणि उपचाराचे मूळ तत्त्वच आपण गमावून बसू.

अँटी ओबेसिटी औषधांची वालोकप्रियता पाहता त्यांनी आपल्या आयुष्यावर किती पगडा बसविला आहे, हे कळून चुकते. त्यामुळे नव्याने विचार करण्याची वेळ आली असून आरोग्य म्हणजे नेमके काय, निरामय जीवन म्हणजे काय, याची संकल्पना औषध कंपन्यांनी समाजमनावर बिंबवण्याच्या अगोदरच ती स्वत:च स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे.

(लेखक वैद्यकीय तज्ञ आहेत.)

Comments are closed.