बारामतीत निवडणूक बिनविरोध नाही, लढण्यावर काँग्रेस ठाम
अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी होत असलेली पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात बारामती आणि राहुरी मतदारसंघात होत असलेली निवडणूक महाविकास आघाडीने लढविली पाहिजे, अशी कॉँग्रेस पक्षाची ठाम भूमिका असल्याचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले.
लोकशाही वाचविण्यासाठी भाजपविरोधात महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढत आहोत. बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात या आधी राष्ट्रवादी कॉँग्रेसने निवडणूक लढवली होती. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी उमेदवार देण्याबाबत राष्ट्रवादीने पुढाकार घ्यावा. यासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये चर्चा व्हावी. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल तर कॉँग्रेस उमेदवार देण्यास तयार असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राने या आधी अनेक मोठे नेते गमावले आहेत. यावेळी झालेल्या पोटनिवडणुकांत बिनविरोध निवडणूक करण्याची पद्धत राज्यात नव्हती. त्या अनुषंगाने विचार करता भाजप आणि घटक पक्षांच्या विरोधात आपण उमेदवार दिला पाहिजे, अशी कॉँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचे सपकाळ म्हणाले.
बिनविरोधसाठी सहकार्य करा – सुनील तटकरे
महाराष्ट्राचा लाडका आणि दिग्गज नेता हरपल्यानंतर होणारी निवडणूक बिनविरोध करणे ही आपली जबाबदारी आहे. शिवाय हेच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरूनही राहील. त्यामुळे महायुती अथवा महाविकास आघाडीतील पक्षांना बारामतीत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे.
बिनविरोध पॅटर्न चालणार नाही – सपकाळ
भाजप व्होटचोरीच्या माध्यमातून आतापर्यंत निवडणुका जिंकत आलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांपासून बिनविरोध निवडणुका जिंकण्याचा पॅटर्न त्यांनी सुरू केला आहे. दबावाचे राजकारण करून विधानसभा निवडणुकांतही हा कित्ता भाजपकडून गिरवला जाण्याची शक्यता आहे. पण त्यांचा हा बिनविरोधचा पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावून सांगितले.
बिनविरोध करा – फडणवीस
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशी होईल. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर भाजपने पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मन मोठे करून ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
उद्धव ठाकरे-सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा
बारामती पोटनिवडणुकीवर सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मिळण्याबाबत चर्चा केली.
Comments are closed.