अणुप्रकल्पावर हल्ला कराल तर संपूर्ण आखात नष्ट होईल! इराणचा जगाला इशारा
अमेरिका-इस्रायलकडून बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य केले जात असल्याने इराण संतापला आहे. ‘शत्रूच्या हल्ल्यामुळे बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पातून किरणोत्सर्ग झाला तर फक्त इराणच नव्हे, संपूर्ण आखाताचा विनाश होईल. एकही माणूस जिवंत राहणार नाही,’ असा सावधानतेचा इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आज जगाला दिला.
जंगजंग पछाडूनही इराण हार मानत नसल्याने अमेरिका आणि इस्रायल बेभान झाले आहेत. इराणमधील वीज, तेल निर्मिती केंद्रे, खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पांसह अणुऊर्जा प्रकल्पांना अंदाधुंद लक्ष्य केले जात आहे. इराणच्या बुशेहर अणुप्रकल्पावर अनेकदा हल्ले करण्यात आले आहेत. अमेरिका व इस्रायलच्या या घातकी कृत्यावर जगातील देश मौन बाळगून आहेत. त्यामुळे अब्बास अराघची यांनी संताप व्यक्त केला. रशिया, युक्रेनचा दाखला देत त्यांनी पाश्चात्य राष्ट्रांच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. युक्रेनमधील झापोरिझिया अणुप्रकल्पावर रशियाने हल्ला करताच पाश्चात्य राष्ट्रांनी आरडाओरड सुरू केली. मात्र, इराणी अणुप्रकल्पांवरील हल्ल्यांवर सगळे शांत आहेत, असे अराघची म्हणाले.
अमेरिकेची नाचक्की; इराणच्या हल्ल्यात सीआयए कार्यालय उद्ध्वस्त
इराणच्या हल्ल्यात झालेल्या हानीची माहिती अमेरिका लपवत असल्याचे समोर आले आहे. मागील महिन्यात इराणने सौदीतील अमेरिकेच्या दूतावासावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात सीआयएचे कार्यालय उद्ध्वस्त झाले आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने ही माहिती दिली आहे. त्यानुसार, 3 मार्चच्या रात्री इराणने एका मिनिटात दोन ड्रोन डागले. या ड्रोन्सनी सौदीची हवाई संरक्षण यंत्रणा भेदून अमेरिकी दूतावासातील सीआयएच्या केंद्राचा वेध घेतला. त्यात दूतावासाचे मोठे नुकसान झाले तर सीआयएचे कार्यालय जळून खाक झाले. सीआयए ही अमेरिकेची जगप्रसिद्ध गुप्तचर संस्था आहे. सुरक्षेची मजबूत तटबंदी असलेल्या सीआयएच्या केंद्राला यशस्वीरीत्या लक्ष्य करून इराणने अमेरिकेची नाचक्की केली आहे.
48 तासांत होर्मुझ खुली करा, नाहीतर प्रकोप होईल!
डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी इराणला पुन्हा अल्टिमेटम दिला. पुढच्या 48 तासांच्या आत आमच्याशी करार करा किंवा ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ खुली करा, नाहीतर अमेरिकेच्या प्रचंड प्रकोपाचा सामना करण्यास तयार राहा, असे ट्रम्प यांनी बजावले. ‘इराणला मी याआधी दहा दिवसांची मुदत दिली होती. ती वेळ आता संपत आली आहे. केवळ 48 तास उरले आहेत. त्यानंतर सर्वनाश ओढवेल,’ असे ट्रम्प म्हणाले.
Comments are closed.